जीवनदान मिळाले; जन्मानंतर तासाभरातच बाळावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 10:55 AM2022-05-27T10:55:50+5:302022-05-27T10:56:10+5:30
जीवनदान मिळाले; मुलुंड येथील रुग्णालयात यशस्वी उपचार
मुंबई : जन्मजात हृदयदोष असलेल्या एका नवजात बालिकेवर तिच्या जन्मानंतर अवघ्या तासाभरातच ओपन-हार्ट शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाला जीवनदान देणारी ही शस्त्रक्रिया सहा तासांहून अधिक काळ चालली. ‘फीटल इको’ चाचणीत बाळातील जन्मजात हृदयदोष प्राणघातक असल्याचे दिसून आले होते. बाळाला वाचविण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रिया गरजेची होती.
मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट पीडिॲट्रिक कार्डिओथोरॅसिस सर्जन डॉ. धनंजय मालणकर यांनी बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गरेकर आणि डॉ. श्याम ढाके, पीडिॲट्रिक कार्डिॲक ॲनेस्थेशियोलॉजिस्ट – इन्टेसिव्हिस्ट डॉ. शिवाजी माळी अशा बाळांसाठीच्या हृदयरोग तज्ज्ञांचा समावेश असलेल्या चमूने शस्त्रक्रिया केली. सोलापूरच्या प्रिया घोरपडे यांनी गर्भावस्थेच्या ३६व्या आठवड्यामध्ये करून घेतलेल्या ‘फीटल इको’ चाचणीमध्ये त्यांच्या पोटातील बाळामध्ये दुर्मीळ हृदयदोष असल्याचे दिसून आले. मुलुंड येथील रुग्णालयात पुन्हा एकदा घेतल्या गेलेल्या ‘फीटल इको’ कार्डिओग्राममधून हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम (एचएलएचएस) या आजाराच्या निदानाला पुष्टी मिळाली. या हृदयदोषामध्ये हृदयाची डावी बाजू योग्य प्रकारे आकाराला आलेली नसते, त्यामुळे हृदयाला सुरळीतपणे रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो.
रुग्णालयात ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट डॉ. अतुल गणात्रा यांनी नियोजित वेळी सी-सेक्शन शस्त्रक्रिया पार पाडली.
पीडिॲट्रिक कार्डिओथोरॅसिस सर्जन डॉ. धनंजय मालणकर म्हणाले, एखादे बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा नाळेला चिमटा लावल्यावर त्याने आपला पहिला श्वास घेणे आवश्यक असते. त्यामुळे रक्त अधिक जोमाने फुफ्फुसाकडे प्रवाहित होते. बाळामध्ये ‘एचएलएचएस’ची स्थिती असल्याने व ॲट्रियल सेप्टम अक्षत असल्याने, ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरातून प्रवाहित होण्यासाठी मार्गच नव्हता व यामुळे गुंतागुंतींमध्ये वाढ होऊ शकली असती. शस्त्रक्रियेनंतर बाळाला पीडिॲट्रिक कार्डिॲक आयसीयूमध्ये हलविण्यात आले.