‘त्या’ शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा!, शिक्षणमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:33 AM2017-12-09T02:33:12+5:302017-12-09T02:33:22+5:30
मुंबईतील रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अर्धवेळ रात्रशाळा शिक्षकांचे गेल्या ६ महिन्यांपासून थकलेले वेतन सुरू करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे
मुंबई : मुंबईतील रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अर्धवेळ रात्रशाळा शिक्षकांचे गेल्या ६ महिन्यांपासून थकलेले वेतन सुरू करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी दिले आहेत. याआधी शिक्षक परिषदेने गुरुवारीच तावडे यांची भेट घेत रात्रशाळा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची व्यथा मांडत पूर्णवेळ वेतन देण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, याबाबत शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने प्रथम शिक्षण उपसंचालकांपासून शिक्षण सचिवांपर्यंत साकडे घातले होते. मात्र तरीही पूर्णवेळ वेतन मिळत नसल्याने अखेर गेल्याच आठवड्यात शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाच्या पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे रखडलेले तसेच नियमित वेतन सुरू होणार असल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील रात्रशाळांमधील दुबार काम करणाºया शिक्षकांना कमी करून फक्त रात्रशाळेतच काम करणाºया अर्धवेळ शिक्षकांना नियमित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने याआधीच काढला होता. तसेच रात्रशाळेतील रिक्त पदांवर दिवसा शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यात आले. मात्र मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांत अतिरिक्त शिक्षक नसल्याने रात्र कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. शिक्षक उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने दुबार काम करणाºया कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले. परंतु त्यांचे वेतन सुरू केले नव्हते. अखेर आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वेतनाला मंजुरी दिली.