Join us

मुक्त, दूरस्थच्या प्रवेशाचा मार्ग खडतर; विद्यार्थ्यांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 6:49 AM

विद्यार्थ्यांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना; १७ शाखांची यादी केली जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  अलीकडे शिक्षण संस्थांचे प्रकार व अभ्यासक्रमांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना गोंधळ उडतो. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मुक्त व दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुक्त आणि दुरस्तला प्रवेश ‘खडतर’ बनल्याचे पाहवयास मिळणार आहे.

राज्यात आणि शहरात सध्या सर्व अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने देशातही शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसीने परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. राज्यात आणि मुंबईतही वेगवेगळ्या अभिमत आणि आकृषी विद्यापीठांमध्ये दूरस्थ व मुक्त शिक्षणाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमांना नोकरी सांभाळून शिक्षण घेण्याची इच्छा असणारे हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात. अनेकदा काही महाविद्यालये आणि विद्यापीठांकडून चुकीचे अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या नावाखाली सुरू केले जातात. याबाबत जागरूक राहा, असा सल्ला यूजीसीकडून देण्यात आला आहे. संबंधित शिक्षण संस्थेत विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित असलेला अभ्यासक्रम राबविण्याची परवानगी आहे की नाही याची यूजीसीच्या वेबसाइटवरून खातरजमा करावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

संकेतस्थळ तपासून घेण्याची गरज  विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी शिक्षण संस्थेला यूजीसीने मान्यता दिली आहे का, शिक्षण संस्थेने देऊ केलेला अभ्यासक्रम ऑनलाइन अथवा मुक्त व दूरस्थ पद्धतीने सुरू करण्यासाठी मान्यताप्राप्त आहे का, याची खातरजमा करावी. तसेच या अभ्यासक्रमांचा कालावधी, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता या यूजीसीच्या विहित निकषांनुसार असल्याची खातरजमा करावी.   शिक्षण संस्थांनी त्यांच्या वेबसाइटवर नियामक सांगितले आहे. याशिवाय आवश्यक प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेची प्रत प्रसिद्ध सदर संस्थेकडून केली आहे काय, प्रतिज्ञापत्र, अर्ज आणि अन्य माहितीही वेबसाइटवर जाहीर केली आहे का याची पडताळणी विद्याथ्यांनी करावी असे ही निर्देश यूजीसीने दिले आहेत.

या शाखांना प्रवेश नको याशिवाय यूजीसीने ऑनलाइन किंवा मुक्त व दूरस्थ पद्धतीने शिकविण्यासाठी प्रतिबंधित केलेल्या १७ शाखांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, फिजिओथेरपी, पॅरामेडिकल, फार्मसी, नर्सिंग, डेण्टल, आर्किटेक्चर, विधी, कृषी, हॉर्टिकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, एअरक्रॉप्ट मेण्टेनन्स, व्हिज्युअल आर्ट अँड स्पोट्स, एव्हिएशन आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

टॅग्स :विद्यापीठविद्यार्थी