Join us

ओपन रोड टोल सिस्टीममुळे वेळ वाचणार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुसाट

By सचिन लुंगसे | Published: January 11, 2023 6:52 PM

आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतेक देशांमध्ये वापरली जाणारी ओपन रोड टोल सिस्टीम आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर लागू केली जाईल.

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतेक देशांमध्ये वापरली जाणारी ओपन रोड टोल सिस्टीम आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर लागू केली जाईल. या सिस्टीममुळे ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. अत्याधुनिक तंत्रामुळे  या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा टोल ऑटोमॅटिक भरला जाईल. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांना वेगवान प्रवास करता येईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर १८० मीटर असा सर्वात लांब अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात आलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा प्रकल्प कोकण पट्ट्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. कारण या प्रकल्पामुळे मुंबई थेट रायगड जिल्ह्याशी जोडली जाईल. हा प्रवास करण्यासाठी तासाचा लागणारा अवधी या प्रकल्पामुळे अवघ्या वीस मिनिटांवर येईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प मुंबईला आर्थिक दृष्ट्यादेखील फायदेशीर ठरणार आहे. केवळ आर्थिक नव्हे तर या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासाची गणिते वेगवान पद्धतीने बदलतील. प्रवाशांचा वेळ वाचण्यासह इंधन देखील वाचणार आहे. पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धन होण्यास हातभार लागेल. 

दरम्यान, या प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे देखील वेगाने सुरू आहेत. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. आणि प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातला पहिला सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे.- ज्यामध्ये ओपन रोड टोलिंग सिस्टिम असणार आहे.- सध्या ही सिस्टिम सिंगापूरमध्ये लागू आहे.- ती सिस्टिम भारतात लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे.- याचा मोठा फायदा असा आहे की प्रवासी वाहने टोल भरण्यासाठी वेग कमी न करता टोल प्लाझातून महामार्गाच्या वेगाने वाहन चालवू शकतात.

टॅग्स :एकनाथ शिंदे