सोन्याची नकली बिस्किटे विक्रीचा फंडा उघड
By admin | Published: July 3, 2014 09:24 PM2014-07-03T21:24:11+5:302014-07-03T23:53:38+5:30
भांडुपचे रहिवासी विशाल शिंगरे (२४) या ग्राहकाला घर दाखवण्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे
भाईंदर - भांडुपचे रहिवासी विशाल शिंगरे (२४) या ग्राहकाला घर दाखवण्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे. आसीद पंचानन राणा ऊर्फ राजूशेठ ऊर्फ किशन (३६) रा. विरार, शांतिलाल खिमजी शहा ऊर्फ दीपकशेठ (५८) रा. भाईंदर पिम व अहमद गवस मोहम्मद शरीफ शेख (५८) रा. जोगेश्वरी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ते सोन्याची बनावट बिस्किटे विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याची बाबही तपासात उघड झाली आहे.
शिंगरे या तरुणाला १७ जून २०१४ रोजी संतोष पाटील याने घर दाखवण्याच्या बहाण्याने भाईंदर पूर्वेच्या नवघर परिसरात बोलवले होते. त्या वेळी आसीद, शांतिलाल व अहमद शेख यांनी विशालला आपण संतोषची माणसे आहोत, असे सांगून त्याला १ लाख १२ हजारांना लुटले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली होती. संतोष मात्र अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने केलेल्या समांतर तपासात ही टोळी नकली सोन्याची बिस्किटे विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याचेही उघड झाले. ही टोळी सोन्याचा मुलामा दिलेली बिस्किटे खरेदी करण्यासाठी आलेल्यांसोबत व्यवहार करीत असतानाच त्यांच्यातील एक जण पोलीस म्हणून धाड टाकत असे. त्या वेळी बोगस पोलिसांद्वारे होणारी कारवाई टाळण्याच्या तडजोडीत ही टोळी ग्राहकाकडील रक्कम जबदरस्तीने लाटत असे. या आरोपींनी कोणकोणत्या ग्राहकांना लुटले आहे, त्याचा तपास सध्या सुरू असल्याचे काशिमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल अहिर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)