Join us  

स्मार्ट सिटीमध्ये गांजाची खुलेआम विक्री

By admin | Published: July 29, 2016 2:39 AM

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईला अमली पदार्थ विक्रेत्यांचा गराडा पडला आहे. नेरूळ, तुर्भे, इंदिरानगर, एपीएमसीसह अनेक ठिकाणी खुलेआम गांजा विक्री होत असल्याचे

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईला अमली पदार्थ विक्रेत्यांचा गराडा पडला आहे. नेरूळ, तुर्भे, इंदिरानगर, एपीएमसीसह अनेक ठिकाणी खुलेआम गांजा विक्री होत असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. गांजा व इतर अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरूणांची संख्या वाढत आहे. तरूणाईला व्यसनांच्या गर्तेत ढकलणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांकडूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईमध्ये पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप व सुरेश मेंगडे यांनी दोन वर्षे सर्व अवैध व्यवसाय बंद केले होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात होणाऱ्या जुगारांवरही कारवाई केली होती. परंतु उमाप व मेंगडे यांची बदली होताच शहरातील सर्व अवैध व्यवसाय पुन्हा दुप्पट वेगाने सुरू झाले आहेत. गांजा विक्रीचे अड्डे पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. खुलेआम अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही त्यावर काहीही कारवाई केली जात नाही. एपीएमसी फळ मार्केटसर्वात मोठा अड्डा एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये आहे. फळ मार्केटच्या एसटीडेपोच्या भूखंडाच्या बाजूच्या गेटजवळ मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराला लागून गांजा विक्री करणारे दिवसभर बसून असतात. भाजी मार्केटच्या माथाडी भवनकडील गेटवरही गांजा विक्री केली जाते. मार्केटमध्ये जवळपास २ हजार परप्रांतीय कामगार बेकायदेशीरपणे राहात आहेत. या परप्रांतीयांना गांजा पुरविण्याचे काम केले जात आहे. मंदिराजवळ बसलेले विक्रेते १०० रूपयांना एक पुडी विकत आहेत. पोलीस चौकीजवळ गांजाची लागवड एपीएमसीच्या मसाला मार्केटबाहेर एक गर्दुल्ल्याने झोपडी बांधली आहे. झोपडीच्या आजूबाजूला गांजाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे २०० मीटर अंतरावर पोलीस चौकी आहे व ४०० मीटर अंतरावर एपीएमसी पोलीस स्टेशन व पोलीस उपआयुक्तांचे कार्यालय आहे. अल्पवयीन मुले बनली विक्रेते नेरूळ बालाजी टेकडीच्या मागील बाजूला सेक्टर २८ मधील अरिहंत कृपा इमारतीजवळील झोपडीमध्ये पूर्ण कुटुंब गांजा विक्रीचा व्यवसाय करत आहे. घरातील १० ते १२ वर्षाचा व १७ ते १८ वर्षाचा मोठा मुलगाही गांजाची पुडी बनविण्यापासून त्याची विक्री करण्यापर्यंतचे काम करत आहे. यामधील एका मुलालाही दारूचे व्यसन लागले आहे. पालकच मुलांना गांजा विकण्यास लावत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. येथून नागरिकांसाठी पायरी मार्ग आहे. परंतु अमली पदार्थाच्या अड्ड्यामुळे येथून ये - जा करण्याची भीती वाटू लागली आहे. शाळेतील मुलांनाही राजरोसपणे गांजा विक्री इंदिरानगरमधील एव्हरेस्ट आयटी पार्कच्या बाजूला रोडवर पानटपरीमध्ये खुलेआम गांजा विकला जातो. गांजा विक्री करणारा अल्पवयीन मुलांनाही १०० रूपये घेवून पुडी देत आहे. शाळेचा गणवेश घातलेल्या मुलांना पाठवून गांजा मागितल्यानंतरही संबंधिताने लगेच पुडी काढून दिली. पोलीस स्टेशनमध्ये आमची सेटिंग असते. आम्हाला कोणी काही करू शकत नसल्याच्या वल्गना येथील विक्रेते करू लागले आहेत. पोलीस चौकीपासून ३०० मीटर अंतरावर हा अड्डा आहे. नेरूळ बालाजी मंदिर टेकडी पायथानेरूळमधील बालाजी मंदिर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीमध्ये मोठ्याप्रमाणात गांजा विक्रीचा अड्डा आहे. बालाजी टेकडीवरील चर्चजवळील पादचारी मार्गावरील पायऱ्यांच्या शेवटच्या टोकाला असलेल्या झोपडीमध्ये सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. सेक्टर २८ मधील (सेक्टर २० ला लागून) अरिहंत कृपा इमारतीला लागूनच ही झोपडी आहे. येथे पहाटेपासून रात्री १२ किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ गांजा खरेदीसाठी तरूण येत असतात. येथे येणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन व इतर उच्च शिक्षण घेणाऱ्या तरूणांची संख्या मोठी आहे. तरूण बालाजी मंदिराजवळ किंवा अरिहंत कृपा इमारतीच्या बाहेर मोटारसायकल उभी करून चालत झोपडीपर्यंत जातात. ७० रूपये, १५० रूपये किमतीची गांजाची पुडी खरेदी करून तेथून तत्काळ बाहेर पडतात. दिवसभर १०० पेक्षा जास्त तरूण येथून गांजा खरेदी करत आहेत. बालाजी टेकडीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमधील दुसऱ्या एका झोपडीतही गांजाची विक्री होते.तुर्भेनाका इंदिरानगरतुर्भेनाका ते महापेकडे जाणाऱ्या रोडवर एव्हरेस्ट आयटी पार्कच्या बाजूला पानटपरीवरही गांजाची विक्री केली जात आहे. सानपाडा व धान्य मार्केटबाहेरील झोपड्यांमध्येही हा व्यवसाय सुरू असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. शहरात अनेक ठिकाणी गांजाची लागवडही केली जात आहे. इंदिरानगर परिसरात एक ठिकाणी गांजाची रोपे लावली असल्याची चर्चा आहे. एपीएमसीमधील भयानक वास्तव बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटमधील अनेक परप्रांतीय कामगार व्यसनांच्या आहारी गेले आहेत. विशेष म्हणजे मार्केटच्या लिलावगृहाला लागून असलेल्या विंगच्या कोपऱ्यात संरक्षण भिंतीला लागून अनधिकृत मंदिर बांधले आहे. या मंदिराजवळ गांजा विक्री करणारे दिवसभर बसून असतात. लोकमतच्या प्रतिनिधींनी तेथे जावून गांजा पाहिजे असे सांगताच विक्रेत्याने गेटच्या बाहेर बोलावून १०० रूपयांना एक पुडी दिली. कधीही या तुम्हाला गांजा मिळेल. जास्त प्रमाणात असला तरी मिळेल, आमच्याकडे साठा असतो असे सांगितले.

तुकाराम मुंढेंकडे तक्रारमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नेरूळमधील ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमाअंतर्गत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिसरातील गांजा विक्रीचा अड्डा बंद करून झोपडीवरही कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी कारवाईची जबाबदारी पोलिसांची असली तरी मुंंढे यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून तक्रार पोलिसांकडे पाठवितो असे सांगितले. यामुळे जुगार अड्ड्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाची दखल घेतल्याने नागरिकांनी आयुक्तांचे आभार मानले.