सायन-पनवेल महामार्गाच्या सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 06:08 AM2019-12-20T06:08:27+5:302019-12-20T06:08:35+5:30
खारफुटी हटविण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायन-पनवेल महामार्गाचे सहापदरीकरण, ठाणे-बेलापूर उन्नत मार्ग, मेट्रो २ अ व त्याचे २८ खांब तसेच मत्स्यालय विभागाच्या पेण येथील प्रकल्पाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. उच्च न्यायालयाने या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आवश्यक खारफुटींच्या कत्तलीची परवानगी एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि मत्स्यालय विभागाला गुरुवारी दिली.
सायन - पनवेल महामार्गावरील वाशी व तुर्भे येथे रस्ता रुंदीकरणासाठी ४३० खारफुटींची कत्तल करणे आवश्यक आहे तर ठाणे-बेलापूर उन्नत मार्गासाठी ६३ खारफुटी तोडाव्या लागतील, असे एमएमआरडीएने अर्जात म्हटले आहे. तर मालवणी येथे मेट्रो २ अ चे कारशेड १उभारण्यासाठी मालवणी व आजूबाजूच्या परिसरातील ८६ खारफुटी हटवाव्या लागतील. याच मार्गिकेसाठी उभाराव्या लागणाऱ्या २८ खांबांपैकी २४ खांब सीआरझेड १ मध्ये येतात. तर उर्वरित ४ खांब सीआरझेड - २मध्ये येतात. सीआरझेड १ व २ मध्ये बांधकाम करण्याची परवानगी मिळावी, यासाठी एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली.
राज्याच्या मत्स्यालय विभागाला पेण येथील वरेडी येथे मासे सुकविण्याचा प्लॅटफॉर्म व बोट यार्ड अद्ययावत करायचे आहे. या बांधकामासाठी खारफुटींची कत्तल करायची नसली तरी हे बांधकाम कांदळवनाच्या ५० मीटर बफर झोनमध्ये येत असल्याने न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे मत्स्यालय विभागानेही न्यायालयात अर्ज केला. या सर्व अर्जांवर न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने एकत्रितपणे निकाल दिला.