Join us

‘गोखले’-‘बर्फीवाला’ पूल लवकरात लवकर खुला करा; भूषण गगराणी यांचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 10:32 AM

जोडणीचे काम अंतिम टप्प्यात.

मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा  गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कामे जलदगतीने करून पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले. 

सध्या पालिकेकडून वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आणि तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी गगराणी यांनी केली. त्यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत गगराणी यांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यान, सांताक्रुझ येथील लायन जुहू महापालिका बाल उद्यानाला (एरोप्लेन गार्डन) भेट दिली.

कमला नेहरू उद्यानाची दररोज स्वच्छता करा-

सांताक्रुझ येथील बाल उद्यानात त्यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. कमला नेहरू उद्यानात सुरू असलेल्या कामांची आयुक्तांनी माहिती घेतली. उद्यानात दररोज स्वच्छता करा, वाढलेल्या गवताची कापणी करा, उद्यानात साचणाऱ्या कचऱ्याची रोज विल्हेवाट लावा, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर महिला सुरक्षारक्षक नेमा, आदी सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या.

कूपर रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस-

गगराणी यांनी कूपर हॉस्पिटल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयालादेखील भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करीत येथील कामकाजाचाही आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सुविधांविषयी माहिती दिली. 

नागरी सुविधा केंद्राला भेट-

पालिकेच्या ‘के पूर्व’ विभागातील नागरी सुविधा केंद्रालाही गगराणी यांनी भेट दिली. जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची प्रणाली, विविध कर संकलनाचे कामकाज कसे सुरू आहे, याविषयी थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत  माहिती जाणून घेतली. नागरिकांच्या सुविधेसाठी लावलेल्या डिजिटल फलकांचेही कौतुक केले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअंधेरी