मुक्त विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध होणार डिजिलॉकरद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:01+5:302021-09-21T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता त्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकर सुविधेद्वारे उपलब्ध करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता त्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकर सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्याबाबतच्या प्रणालीचे काल कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० मधील मे २०१९ व मे २०२० मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण दोन लाख नव्वद हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र हे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहेत. याचप्रमाणे बाकीची पदवी प्रमाणपत्रेही टप्प्याटप्प्याने डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशान्वये डिजिलॉकरवर अकॅडेमिक अवॉर्ड रेकॉर्ड नोंदणी केली आहे. त्यानुसार सन २०१९ व २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची २६ व्या दीक्षान्त समारंभाची एकूण दोन लाख नव्वद हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
यासाठी विद्यार्थ्यांनी digilocker.gov.in या संकेतस्थळावर किंवा डिजिलॉकर हे ॲप मोबाइल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून आपल्या आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी एज्युकेशन या विकल्पावर क्लिक करून आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नाव निवडावे व नंतर पदवी प्रमाणपत्र हा विकल्प निवडून आपली शैक्षणिक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यास त्याचे पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरने उपलब्ध होणार आहे.
उद्घाटनाप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, प्रोग्रॅमर राजेंद्र मरकड, डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर प्रेमनाथ सोनवणे, सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रदीपकुमार पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतातील एकूण विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांच्यापैकी १७६ विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी डिजिलॉकरवर नोंदणी केली असून, डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानंतर महाराष्ट्रातील दुसरे विद्यापीठ ठरले आहे.
क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार माहिती
प्रमाणपत्रावर क्यूआरकोड असून, त्यास स्कॅन केल्यास आपली शैक्षणिक माहिती उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करतेवेळी आपला आधार क्रमांक नोंदविला आहे, अशा विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांकाला डिजिलॉकरमध्ये लिंक करण्यात आलेले आहे. डिजिटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असून त्यास माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर वैधता राहील.
असे ठेवू शकता डिजिलॉकरमध्ये प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांना डिजिलॉकर ॲप्लिकेशन डाऊनलोड करून अकाउंट उघडावे लागेल. गेट द डॉक्युमेंट फ्रॉम युनिव्हर्सिटी विकल्पावर क्लिक करावे लागेल. नंतर कायम नोंदणी क्रमांक टाकून परीक्षा उत्तीर्णतेचे वर्ष निवडावे लागेल. नंतर विद्यार्थी प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकणार आहेत.