लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उरणला मुंबई उपनगरीय नेटवर्कशी जोडण्याच्या दिशेने एक पुढचे पाऊल पडले आहे. मध्य रेल्वेने नेरुळ/बेलापूर-उरण प्रकल्पासाठी ६१ मीटरचे दोन ओपन वेब गर्डर तीन तासांचा ब्लॉक घेऊन नुकतेच लॉन्च केले. हे ६१ मीटर ओपन वेब गर्डर मनमाडच्या मध्य रेल्वे अभियांत्रिकी कार्यशाळेत तयार करण्यात आले. प्रत्येक गर्डरचे वजन २३२ मेट्रिक टन आहे.
गर्डर्स सुरक्षितरीत्या उचलण्यासाठी, विशेष विकसित केलेल्या लिफ्टिंग फ्रेमचा वापर करण्यात आला. गर्डर्स उचलताना, या पुलासाठी तयार केलेल्या तीन इनक्लिनोमीटरद्वारे रोटेशनल हालचालींचे निरीक्षण केले गेले. इनक्लिनोमीटर पहिल्यांदाच वापरण्यात आले. याशिवाय, रेल्वेच्या स्वतःच्या स्ट्रक्चरल टेस्टिंग युनिटला मध्य रेल्वेच्या ब्रिज युनिटने तैनात केले होते, जेणेकरून लॉन्चिंग होताना उद्भवणाऱ्या गंभीर प्रसंगावर मात करता येईल. यासाठी सहा स्टेन गेज आणि दोन एक्सेलेरोमीटर वापरण्यात आले आणि कोणत्याही घटकांना जास्त ताण न देता प्रक्षेपण करण्यात आले. ३ जुलै २०२१ रोजी डाउन ट्रॅक वेब गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले आणि १२ ऑगस्ट २०२१ रोजी अप ट्रॅक वेब गर्डर लॉन्च करण्यात आले.