उघडणार तारांकित रुग्णालयांचे द्वार; गरीब रुग्णांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 03:02 AM2019-02-10T03:02:42+5:302019-02-10T03:03:07+5:30
अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असतानाही गरीब रुग्णांना खिसा रिकामा असल्याने जीव गमवावा लागत होता. पण जसलोक, नानावटीसारख्या बड्या रुग्णालयांतही आता त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतील.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असतानाही गरीब रुग्णांना खिसा रिकामा असल्याने जीव गमवावा लागत होता. पण जसलोक, नानावटीसारख्या बड्या रुग्णालयांतही आता त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतील. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून पंचतारांकित रुग्णालयांतील राखीव खाटा पालिका रुग्णालयातील रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होतील.
मुंबईतील एकूण ४० हजार रुग्ण खाटांपैकी पालिका रुग्णालयांमध्ये ११ हजार ९०० खाटा आहेत. परंतु या तुलनेत पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये राखीव १० टक्के खाटा अनेकदा गरीब रुग्णांसाठी उपलब्ध होत नाहीत. अशा सुमारे आठशे राखीव खाटा त्यांना मिळाव्यात यासाठी धर्मादाय आयुक्तांसह पालिका प्रशासनाची चर्चा सुरू होती. अखेर पालिका रुग्णालयातून आलेल्या रुग्णांसाठी चारशे खाटा उपलब्ध होतील. यामुळे धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून मुंबईत चालविण्यात येणाºया ७५ रुग्णालयांत हे रुग्ण दाखल होऊ शकतील.
असा मिळणार लाभ
धर्मादाय रुग्णालयातील राखीव रिक्त खाटांच्या माहितीचा फलक पालिका रुग्णालयात लावण्यात येईल. त्यामुळे या खाटांचा उपयोग होत असल्याची खात्री करता येईल. तसेच गरीब रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात पाठवले का, याची खात्री करण्यासाठी पालिकेतील साहाय्यक वैद्यकीय अधिकाºयाची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल.