बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन विक्रीची कवाडे खुली; महिलांच्या रोजगारासाठी BMC चा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:18 AM2024-06-23T11:18:34+5:302024-06-23T11:19:07+5:30
महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांची उत्पादने ऑनलाइन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांची उत्पादने ऑनलाइन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात दररोज नवनवीन उत्पादनांची भर पडत आहे आणि अधिकाधिक महिलांना रोजगार मिळत आहे. पालिकेच्या नियोजन विभागातर्फे महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात. या महिलांनी तयार केलेली उत्पादने पारंपरिक पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेने व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. आता त्यात ऑनलाइन विक्रीचाही पर्याय खुला करून देण्यात आला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने https:// shgeshop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पालिकेने अर्थसहाय्य केलेले मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांत आठ हजारांपेक्षा अधिक बचत गट आहेत. प्रत्येक बचत गटात दहा सदस्य आहेत. या सर्व महिलांना त्यांचे घरकाम सांभाळून कुटुंबासाठी हातभार लावता यावा यासाठी विविध वस्तू, उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरजू महिलांना रोजगार मिळावा, महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी नियोजन विभागाने पालिकेच्या २४ विभागांत महिला बचत गटांच्या वस्तूंना प्रदर्शने, व्यापारी संकुले, यात्रा, उत्सवांमध्ये विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे. तसेच या महिला आपली उत्पादने काही दुकानांमार्फतही ग्राहकांना पुरवत आहेत.
महिलांना प्रशिक्षण
- होतकरू मराठी मुलांनी 3 नव उद्योगाच्या (स्टार्ट अप) माध्यमातून https:// shgeshop.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे.
या संकेतस्थळावर
- विविध ग्राहकोपयोगी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांतील महिलांना याच मुलांच्या माध्यमातून ऑनलाईन ऑर्डर कशी स्वीकारावी.
- त्यानंतर ग्राहकांना 3 संबंधित वस्तू कशी विकावी, ऑनलाइन व्यवहार कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोणत्या वस्तू ऑनलाईन?
- उटणे, अगरबत्ती, जूटबॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्याचे दागिने, साड्या, रांगोळी, परफ्यूम, ड्रेस, लेडीज कुर्तीज, फॅन्सी कैंडल्स.
- विविध प्रकारचे आकर्षक तोरण, दिवाळीसाठी कंदील, आकर्षक पणत्या, बांबूच्या आकर्षक वस्तू तसेच सजावटीचे आकर्षक साहित्य.
पहिल्या टप्प्यात ५० बचत गट
ऑनलाईन व्यवसायासाठी नियोजन विभागाने बचत गटांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार ज्या बचत गटांची उत्पादने (खाद्यपदार्थ वगळून) टिकावू असतील, त्यांना ऑनलाइन विक्रीसाठी पुढे केले आहे. पुढील टप्प्यांत साधारण महिनाभर टिकू शकतील, असे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांनाही ऑनलाइन विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.