Join us  

अत्रे रंगमंदिराच्या खर्चाला लागलेली गळती उघड

By admin | Published: April 16, 2016 1:06 AM

नाटक सुरू असताना एसी बिघडल्याने कलाकारांसह-प्रेक्षकांना घाम फोडणाऱ्या कल्याणच्या अत्रे रंगमंदिरातील दुरूस्ती-देखभालीचा खर्च नेमका जातो कुठे, त्याला कसे पाय फुटतात

- मुरलीधर भवार,  कल्याण

नाटक सुरू असताना एसी बिघडल्याने कलाकारांसह-प्रेक्षकांना घाम फोडणाऱ्या कल्याणच्या अत्रे रंगमंदिरातील दुरूस्ती-देखभालीचा खर्च नेमका जातो कुठे, त्याला कसे पाय फुटतात, त्याला नेमका कशी गळती लागते त्याचे उघड दर्शन सर्वांना झाले. नाट्यगृहाच्या दुरूस्ती-देखभालीवर वर्षभरात दीड कोटी रुपये खर्च करूनही प्रेक्षक-नाट्य कलाकारांना योग्य सोयी-सुविधा मिळत नसतील तर हा पांढरा हत्ती का पोसायचा, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणा गुरूवारी बंद पडल्याने ‘ती फुलराणी’चा पहिला अंक कलाकारांनी घामाघूम होत सादर केला. नंतर प्रेक्षकांनी मध्यंतरात पुढचा अंक रोखून धरल्याने धावपळ करत यंत्रणा कशीबशी सुरू झाली. नाट्यगृहाचे भाडे वसूल केले जात असल्याने ते आगाऊ घेतले जात असल्याने सर्व यंत्रमा सुरळीत टेवण्याची जबाबदरी पालिकेवर आहे. पण नाट्य व्यवस्थापकांकडून ती नीट पार पाडली जात नाही. त्याबद्दल जाबही विचारला जात नाही की कुणावर कारवाई होत नाही. रंगमंदिरातील एसीचे एक युनिट बंद पडल्याने गुरूवारी प्रेक्षक घामाघूम झाले. नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीवर दीड कोटीचा खर्च होतो आणि भाडयापोटी वर्षाला ७५ लाखाचे उत्पन्न मिळते. नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष नसल्याने खर्चाच्या निम्मीच रक्कम जमा होते. नफा कमावणे हा हेतू नसला तरी नाटक वगळता अन्य कार्यक्रम, उपक्रमांना प्राधान्य देत त्याच्या जमा-खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. हेतू उदात्त, भाडेही घसघशीतमराठी नाटक, सांस्कृतिक चळवळ जगावी, कलाकार घडावे, या उदात्त हेतूने तोटा सहन करुनही नाट्यगृह चालविले जाते. नाटक कंपनीकडून एका शोचे किमान भाडे साडेचार हजार तर कमाल साडेआठ हजार रुपये घेतले जाते. सामाजिक संस्था, खाजगी संस्था, सांस्कृतिक संस्था, अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या कार्यक्रमांसाठी एका शोचे किमान दहा हजार तर कमाल ३० हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जाते. तिकीटाचे दर १०० ते तीनशे रुपयांदरम्यान असतात. संस्था जादा तिकीट दर आकारणार असेल तर तर भाड्याचे स्वरुप बदलते. पुन्हा खर्च करणार : रामनाथ सोनवणे आयुक्तपदी असताना नाट्य निर्मात्यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले पुढाकार घेत नाट्यगृहाच्या व्यवस्थेबद्दल आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी आयुक्तांनी नाट्यगृहाची दुरुस्ती केली होती. त्याला अवघी काही वर्षे उलटतात न उलटतात तोच पुन्हा दुरुस्तीची रड सुरु झाली आहे. नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी दोन कोटी ३१ लाखांची तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या दुुरुस्तीचे काम झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निधीतून प्राधान्याने अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणा अत्याधुनिक-अद्ययावत करण्यात येणार असल्याचे गायकर यांनी स्पष्ट केले आहे. शेखर ताम्हाणे यांची पोस्ट व्हायरलआचार्य अत्रे रंगमंदिरातील ढेकणांबाबत, तेथे फिरणाऱ्या उंदरांबाबत अभिनेते शेखर ताम्हाणे यांची पोस्ट शुक्रवारी व्हायरल झाली. त्यात त्यांनी नाट्यगृहातील गैरव्यवस्थापनावर बोट ठेवले आहे. अशा स्थितीत नाटक करायचे कसे आणि पाहायचे कसे असा मुद्दा त्यात आहे. ही पोस्ट नेमकी कोणत्या काळातील आहे ते स्पष्ट झाले नसले तरी त्यातून कोट्यवधी रूपयांच्या खर्चानंतरही नाट्यगृहाची अवस्था कशी आहे, त्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.