लाॅकडाऊन उघडणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण - अस्लम शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:06 AM2021-05-27T04:06:53+5:302021-05-27T04:06:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : येत्या १ जूनपासून राज्यातील लाॅकडाऊन उठवणार की आणकी लांबणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या १ जूनपासून राज्यातील लाॅकडाऊन उठवणार की आणकी लांबणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. राज्य सरकारकडून मात्र एकदम लाॅकडाऊन उठविणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईसह राज्यात किमान पन्नास टक्के नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण होत नाही तोपर्यंत लाॅकडाऊन पूर्णपणे हटविणे धोक्याचे ठरणार असल्याचे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी स्पष्ट केले.
अस्लम शेख यांनी आज माध्यमांशी बोलताना लाॅकडाऊनसंदर्भात भाष्य केले. मुंबई आणि राज्यात ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन उठवणे हे म्हणजे कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवणे गरजेचे आहे. सलून, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स, कपडे आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सुरुवातीला उघडावीत. त्यानंतर बाकीची दुकाने आणि इतर दैनंदिन व्यवहार सुरू व्हावेत, असे मत अस्लम शेख यांनी मांडले.
दरम्यान, विविध व्यापारी संघटनांनीसुद्धा १ जूननंतर दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करत दररोज किमान आठ तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.