आलिशान 'मुंबई मेडन' क्रूझचे उदघाटन  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 09:05 PM2018-01-14T21:05:22+5:302018-01-14T21:05:56+5:30

संध्याकाळच्या वेळी विरंगुळ्यासाठी समुद्रकिना-यावर बसण्याचा जमाना गेला, आता चक्क मावळत्या सूर्याच्या साक्षीने थेट समुद्रात आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे.

Opening of the 'Mumbai Maiden' Cruise Hotel | आलिशान 'मुंबई मेडन' क्रूझचे उदघाटन  

आलिशान 'मुंबई मेडन' क्रूझचे उदघाटन  

Next

- मनोहर कुंभेजकर  
मुंबई :संध्याकाळच्या वेळी विरंगुळ्यासाठी समुद्रकिना-यावर बसण्याचा जमाना गेला, आता चक्क मावळत्या सूर्याच्या साक्षीने थेट समुद्रात आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे.'मुंबई मेडन' या मुबंई शहरातील पहिल्या समुद्री क्रूझच्या निमित्ताने मुंबईकरांना ही संधी मिळणार आहे. 
राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते वांद्रे-सी लिंक येथे 'मुंबई मेडन' क्रूझचे उदघाटन झाले. याप्रसंगी डॉ. विलियम ब्रिट्टो, विधानसभेचे भाजपाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित, आमदार सुजितसिंग ठाकूर, माजी आमदार व नगरसेवक अतुल शाह व या क्रूझचे मालक विक्रांत चांदवडकर व संजीव अगरवाल उपस्थित होते. 
वांद्रे वरळी सागरी सेतू च्या डाव्या बाजूला एक जेट्टी बांधण्यात आली असून तिथून छोट्या पॉवर बोटीने प्रवास करुन आपण ​समुद्रातल्या  'मुंबई मेडन'  क्रूझजवळ पोहोचतो.एकावेळी 285 पर्यटकांचं आदरातिथ्य व मनोरंजन करण्याची क्षमता असलेल्या या क्रूझवर पोहोचताच इथला स्वर्गीय आनंद कुणालाही भारावून टाकतो. क्रूझच्या सर्वांत वरच्या मजल्या वरुन ३६० अंशांच्या कोनातून संपूर्ण सागरकिनारा एका नजरेत पाहण्याची अवर्णनीय  संधी प्राप्त होते. त्याच्या खालच्या मजल्यावर खाद्यपदार्थ आणि शीतपेयं तसेच पहिल्या मजल्यावर डायनिंग हॉलची सोय आहे. इतकंच नव्हे तर, क्रूझवरील​ बँक्वेट हॉलमध्ये पार्टी, सण-समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. 
'मुंबई मेडन' या क्रूझसह 'एमव्हीएव्हीऑर' व 'जय सोफिया' या बोटींवरही तरंगते हॉटेल साकारण्यात आले असून या बोटींवरही पर्यटकांना दोन तास समुद्रात राहून सुर्यास्त बघण्याची संधी मिळणार आहे. कोस्टल टुरिझमला चालना देणा-या या क्रूझवरील हाॅटेलांमुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. पर्यटनाद्वारे अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याचे हे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळेच प्रत्यक्षात अवतरत आहे, असं मत  पर्यटन मंत्री  रावल यांनी व्यक्त केले. रावल पुढे म्हणाले, "आज मुंबईमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. समुद्रसफरीची मनसोक्त सैर करण्यासाठी 'मुंबई मेडन' ही क्रूझ सज्ज झाली असून मुंबईकर आणि विदेशी पर्यटकांनी त्याचा आनंद घ्यावा. यामुळे मुंबईच्या पर्यटन व्यवसायात वृद्धी होणार आहे."  सागरी पर्यटनाला महाराष्ट्र शासन प्रोत्साहन देणार असून मुंबईला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा निर्धार शासनाने केला आहे, असेही  रावल यांनी सांगितले. 
 

Web Title: Opening of the 'Mumbai Maiden' Cruise Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.