Join us

राष्ट्रवादीचे दुतोंडी राजकारण नगरच्या निवडणुकीत उघड - रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 1:49 AM

अहमदनगरमध्ये भाजपाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी उभारण्याचे प्रयत्न होते. यासाठी आपण स्वत: अजित पवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती.

मुंबई : अहमदनगरमध्ये भाजपाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी उभारण्याचे प्रयत्न होते. यासाठी आपण स्वत: अजित पवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, राष्ट्रवादीने ऐन वेळी भाजपाला साथ दिल्याने, राष्ट्रवादीचे दुतोंडी राजकारण उघड झाल्याची टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली.अहमदनगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही शिवसेनेला आपला महापौर बसविता आला नाही. राष्ट्रवादीच्या सर्व १८ नगरसेवकांनी थेट भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात आपली मते टाकली. याबाबत रामदास कदम म्हणाले की, अहमदनगरमध्ये सर्वजण भाजपाविरोधात लढलो. त्यामुळे भाजपाच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी करत, महापौर निवडून आणण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी अजित पवार, विखे-पाटील यांच्याशी मी स्वत: बोलणी केली. मात्र, ज्या भाजपाच्या विरोधात लढलो, त्यांनाच पाठिंबा देत शिवसेनेला शह देण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला.नगर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी ही भाजपाबरोबर आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता शिवसेना कधी बाहेर पडते आणि आपण सत्तेत सामील होतो, याची घाई राष्ट्रवादीला झाली आहे. या प्रकरणामुळे दुतोंडी साप कोण, याचे उत्तर अजित पवार यांना मिळाले असेल, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

टॅग्स :रामदास कदम