विजय सिंघल यांचे निर्देश; इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी राज्य व केंद्र सरकार अत्यंत गंभीर असून, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. याची व्यवहार्यता लक्षात घेऊन राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. चार्जिंग स्टेशनची संख्या अजून मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज असून, पुढच्या काही दिवसात किमान १०० नवीन चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित करावीत, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले.
राज्य भार प्रेषण केंद्राला विजय सिंघल यांनी भेट देऊन तेथील दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. सोबतच इटरनिटी येथील इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे तसेच तांत्रिक व माहिती तंत्रज्ञ विभागाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महावितरणने ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्यासह चांगली सेवा दिली. यापुढेही ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यास महावितरण कटिबद्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी या कोरोना काळातील थकीत वीजबिलासह आपली चालू वीजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे.
दरम्यान, राज्य भार प्रेषण केंद्राच्या पाहणीप्रसंगी राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतारे यांनी राज्य भार प्रेषण केंद्राच्या कामाचे संगणकीय सादरीकरण केले. राज्य भार प्रेषण केंद्राच्या मुख्य अभियंता जुईली वाघ यांनी ४०० केव्ही व ७६५ केव्ही वीज पारेषण नेटवर्कबद्दल सविस्तर माहिती दिली. स्क्वाॅडा सेंटरचीही पाहणी केली. उपकार्यकारी अभियंता ज्ञानदीप सांगेलकर व सहाय्यक अभियंता मिथुन पाटील यांनी स्क्वाॅडा सेंटरच्या कामकाजाबाबत संगणकीय सादरीकरण केले. तर, मुख्य अभियंता परेश भागवत यांनी चार्जिंग स्टेशनबद्दल माहिती दिली.
........................................................