मुंबईत ऑपरेशन ऑल आउट; ७७ हजार वाहनांची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 01:23 PM2023-08-15T13:23:56+5:302023-08-15T13:24:59+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत शहरातील २२९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील १,६६० गुन्हेगारांची तपासणी केली तर ३५५ आरोपींची धरपकड केली. तसेच, जवळपास ११३ ठिकाणी नाकाबंदी करून एकूण ७ हजार ७६८ वाहनांची तपासणी केली. यातील २ हजार ५१५ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
शनिवारी रात्री ११ पासून मध्यरात्री २ पर्यंत राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट दरम्यान पोलिसांनी शहरातील ६०५ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात शहरातील पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त तसेच विशेष शाखेचे अपर पोलिस आयुक्त, १३ परिमंडळाचे उपायुक्त, सर्व विभागीय सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी व अंमलदार या ऑपरेशन ऑल आउटमध्ये सहभागी झाले होते.
२० ठिकाणी छापे
शहरात चालणाऱ्या दारूविक्री, जुगार अशा बेकायदा व्यवसाय चालणाऱ्या २० ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे. तसेच, अमली पदार्थ कायद्यान्वये ३५० आरोपी तपासण्यात आले आहे.
९३३ अस्थापनांची तपासणी
शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी शहरातील हॉटेल्स, लॉज, मुसाफीरखाने अशा ९३३ आस्थापनांची तपासणी पोलिसांनी केली.
३० आरोपींना अटक
- अजामीनपात्र वॉरंट बजावलेल्या ७९ आणि बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३० आरोपींना अटक केली आहे.
- त्यांच्याजवळून चाकू, तलवारी अशी शस्त्रे जप्त केली आहेत.
- शहरातून तडीपार केेलेल्या ४६ आरोपींवर कारवाई केली आहे.
- जबरी चोरीतील ६२, कारागृहातून बाहेर आलेल्या १३ आणि फरारी ४ आरोपींना अटक केली आहे.