मुंबई : भविष्यात युद्धकाळात तसेच सैन्य कारवाईदरम्यान तिन्ही सेना दलांमध्ये मनुष्यबळ आणि संसाधनांच्या दृष्टीने उत्तम समन्वय रहावा आणि तातडीने आवश्यक रसद पुरवठा करता यावा, या दृष्टीने गुरुवारी मुंबईतील संयुक्त रसद पुरवठा केंद्र कार्यान्वित करण्यात आले. देशभरातील हे अशा प्रकारचे तिसरे केंद्र असून, तिन्ही दलांचे प्रमुख बिपिन रावत यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे या केंद्राची सुरुवात केली.
मुंबईतील संयुक्त रसद केंद्रातून लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही सैन्य दलांना आवश्यक रसद पुरवठा केला जाणार आहे. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, अन्नधान्य, इंधन, इतर साधनसामग्री, वाहतुकीची साधने, कपडेलत्त्यासोबतच अभियांत्रिकी सहाय्य पुरविण्यात येणार असून, त्यामुळे सैन्य दलातील सुसूत्रता वाढण्यास मदत होणार असल्याचे संरक्षण विभागाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
युद्धांचे आणि सैन्य कारवायांचे स्वरूप बदलत आहे. भविष्यातील लढाया, कारवाया या तिन्ही दलांना संयुक्तपणे पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे तिन्ही दलांमध्ये मनुष्यबळासह संसाधनाच्या आघाडीवर उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संयुक्त रसद पुरवठा केंद्र महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. गुवाहाटी, पोर्टब्लेअर आणि मुंबईत अशा प्रकारची रसद पुरवठा केंद्र चालविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली होती. गुवाहाटी आणि पोर्टब्लेअर ही दोन्ही केंद्र यापूर्वीच सुरू करण्यात आली असून, रावत यांच्या हस्ते मुंबईतील केंद्राचे कार्यान्वियन करण्यात आले.
सैन्य दलांचे आधुनिकीकरण आणि खर्च कपातीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी संयुक्त रसद पुरवठा केंद्राची महत्त्वाची भूमिका असणार असल्याचे रावत यावेळी म्हणाले. पुरवठा केंद्रांच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी तिन्ही दलातील वरिष्ठ निवृत्त अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, या केंद्रांच्या आदर्श कार्यपद्धती, मार्गदर्शक सूचनांच्या पुस्तकाचेही रावत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.