Join us

अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण; महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरुय, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 7:53 AM

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार, या चर्चेने सोमवारी पुन्हा जोर धरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले.

दुपारनंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याच्या चर्चेने जोर धरला. दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाही त्यांनी चुप्पी साधल्याने चर्चेला बळच मिळाले. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम कायम

अजित पवारांनी हा खुलासा केला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. २०१९ रोजी अजित पवारांनी पहाटे राजभवनभर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हाही असे काही घडेल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटले नव्हते. तसेच यापूर्वी त्यांनी अचानक अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य असावे, असा संशय राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. यासंदर्भात पक्षातील एका पदाधिकाऱ्याने लोकमत'शी बोलताना सांगितले की, अजित पवार पुढे येऊन जोपर्यंत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत हा संभ्रम कायम राहणार आहे.

अजित पवार काय म्हणाले?

खारघर येथे रविवारी झालेल्या 'महाराष्ट्रभूषण' सोहळ्याच्यावेळी पुरस्कार उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या तसेच उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी 'एमजीएम' हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे, असा खुलासा अजित पवार यांनी ट्विट करत केला आहे. तसेच मंगळवारी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :अजित पवारपृथ्वीराज चव्हाणमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकार