Join us  

मुंबईत हरवलेल्या ११६ मुलांसाठी रेल्वे सुरक्षा बल ठरले ‘फरिश्ते', मुलांची पालकांशी घडविली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:53 AM

मुंबईसारख्या स्वप्नांच्या शहरात कोणी रोजगारासाठी, कोणी चित्रपटात काम करण्यासाठी तर कोणी अन्य आमिषाला भुलून दररोज येत असतो.

मुंबई :मुंबईसारख्या  स्वप्नांच्या शहरात कोणी रोजगारासाठी, कोणी चित्रपटात काम करण्यासाठी तर कोणी अन्य आमिषाला भुलून दररोज येत असतो. अशा घर सोडून आलेल्या मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या घरी पाठवणूक करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नेहमी करीत असते. याला साजेशे नावही देण्यात आले असून या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेंतर्गत गेल्या तब्बल ४ महिन्यांच्या काळात घर सोडून आलेल्या ११६ मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे आणि मुलांना पुन्हा त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले गेले आहे.

काही मुले पालकांशी भांडण झाल्याने घर सोडून मुंबईत दाखल होतात, तर काहींना फसवूनदेखील मुंबई,  नाशिक, पुण्यासारख्या महानगरात आणले. काही मुले मुंबईसारख्या या मायावी नगरीत आपले बालपण हरवून बसतात, तर काही वाईट मार्गाला लावली जातात.  

छोटी-मोठी कामे-

काहींना अपंग करून भिक्षादेखील मागायला लावली जाते. तर काहींना कुंटणखान्यात विकले  जाते. रेल्वे प्रवासाचे सोपे आणि स्वस्त आणि बरेचदा फुकट साधन बनवले जात असल्याने ही मुले आपल्या शहरातून मुंबईमध्ये रेल्वेद्वारेच दाखल होत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरच रेंगाळत, त्याच्या आसपास राहत, छोटी मोठी कामे करत ही मुले मुंबईत आपला उदरनिर्वाह करत असतात.

चेहऱ्यावर हास्य-

१) या अशा मुलांना वेळीच ओळखून त्यांना मदत करण्याचे काम रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या पोलिसांकडून केले जाते. ज्यावेळी आपल्या आई-वडिलांना ही मुले पुन्हा भेटतात, त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत असतो. पालकांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव असतात. 

२) रेल्वे सुरक्षा दल गेली सात वर्षे ‘नन्हे फरिश्ते’ मोहीम प्रभावीपणे राबवीीत आहे. १ एप्रिल ते २३ जुलै २०२४ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल, मुंबई विभागाने ७३ मुले आणि ४३ मुलींची, एकूण ११६ मुलांची सुटका केली आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वे