मुंबई : रेल्वे स्थानकांवर हरवलेल्या बालकांच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. एक महिना ही मोहीम राबविली जाणार असून त्यासाठी सामाजिक संस्था आणि नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वेचा पसारा हा बराच मोठा आहे. पश्चिम रेल्वे चर्चगेटपासून ते डहाणूपर्यंत तर मध्य रेल्वेवरील मेन लाइन सीएसटी ते कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत त्याचप्रमाणे हार्बर मार्ग हा सीएसटीपासून नवी मुंबईपर्यंत पसरलेला आहे. या मार्गावरुन दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्याशिवाय मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवासीही मोठ्या संख्येने असल्याने त्यांचीही यात भर पडते. मात्र या प्रवासात अनेकदा गर्दीत लहान मुले हरवतात आणि त्यांचा शोध पालकांनाच काय तर रेल्वे पोलिसांनाही लागत नाही. त्यामुळे आपल्या पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला असून त्यांच्या निर्देशानुसार एक मोहीम आखण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. ‘आॅपरेशन मुस्कान’ नावाने असलेली ही मोहीम १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे. यात मागील पाच वर्षांत हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व रेल्वे पोलीस ठाण्यातील बाल पोलीस पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेमध्ये फलाटांवरील विविध ठिकाणी काम करत असलेल्या आणि राहत असलेल्या विनापालक बालकांचा किंवा हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात किंवा त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सोपवण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. याची माहिती संकलित करून ६६६.३१ंू‘३ँीे्र२२्रल्लॅूँ्र’.िॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर टाकून त्याची माहिती प्रसारमाध्यमे व इतर मार्गांनी सर्वांसमोर आणली जाणार आहे. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतानाच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हरवलेल्या बालकांसाठी ‘आॅपरेशन मुस्कान’
By admin | Published: July 01, 2015 12:53 AM