Join us

नेत्रतज्ज्ञांनी शोधला काचबिंदूचा नवा म्युटंट, पहिलेच संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 08:47 IST

उशिरा निदानामुळे अंधत्व येण्याची शक्यता

स्नेहा मोरे मुंबई : राज्यातील नेत्र शल्यचिकित्सकांच्या एका समूहाने ग्लुकोमाचा नवा म्युटंट शोधून काढला आहे. या संशोधनामुळे ग्लुकोमा (काचबिंदू)ची समस्या उद्भवणाऱ्या जनुकाच्या खोलापर्यंत जाणारी तपासणीची साधने शोधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बऱ्याचदा काचबिंदूच्या उशिरा निदानामुळे अंधत्व येते, याचे प्रमाण राज्यासह देशात अधिक असल्याचे दिसून येत आहे. 

सध्या सुरू असलेल्या या संशोधन प्रक्रियेत पुणे, सांगली आणि आयर्लंड येथील नेत्र शल्यचिकित्सकांचा सहभाग आहे. द इन्स्टिट्यूशनल रिव्ह्यू बोर्ड, पीबीएमएएचव्ही देसाई नेत्र रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थांनी संशोधनाला मंजुरी दर्शविली आहे. या अभ्यास संशोधनाविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉ. चित्रा सांबरे यांनी सांगितले की,  लोकांची लाळ आणि रक्तातील नमुने घेतल्यास या विशिष्ट जनुकीय उत्परिवर्ती ओळखण्यासाठी मदत होईल. काही विशेष तपासण्या विकसित केल्यास काचबिंदूचे लवकर निदान होण्यास मदत होईल. या नव्या म्युटंटची शास्त्रीय संज्ञा LOxl1 अशी आहे. 

डोळ्यांच्या पेशीच्या काही उत्परिवर्तींमध्ये प्रथिनांच्या अतिप्रमाणामुळे, अन्य अतिजोखमीच्या  घटकांमुळे काचबिंदू होण्याचा संभाव असतो. याखेरीज, डोळ्यांवर येणारा ताण, यूव्ही प्रकाश किरणेही तितकीच कारणीभूत आहेत. त्याचप्रमाणे, काचबिंदूची समस्या कुटुंबातील अन्य कोणाला असेल तर त्यामुळे याचे निदान होण्याचा धोका असतो. काचबिंदूचे अनेक प्रकार आहेत. 

पहिलेच संशोधननेत्रसमस्येत झालेले हे अशा स्वरूपाचे पहिले अभ्यास संशोधन आहे. यामुळे काचबिंदू निदान आणि उपचार प्रक्रियेत सकारात्मक प्रगती, बदल घडविण्याची ताकद आहे. या दृष्टिकोनातून भविष्यात प्रयत्नही करता येतील, अशी माहिती संशोधनात सहभागी असणारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थमेलोजीचे डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.  

नेत्रतज्ज्ञांनी शोधला काचबिंदूचा नवा म्युटंटदृष्टिहीन होण्याची शक्यता असते.  आशियाई तसेच आफ्रिकी व्यक्तींमध्ये काचबिंदूचे प्रमाण सर्वाधिक आढळते. यापूर्वी युरोपीय वंशांच्या व्यक्तींवर संशोधन झाले होते. सध्या तरी काचबिंदू रोखण्यासाठी कोणतेही उपचार नाहीत. मात्र, सर्व वंशांतील लोकांमध्ये काचबिंदूचा धोका ओळखण्यासाठी आनुवंशिक चाचण्यांची मदत होऊ शकते, असे आमचे संशोधन सांगते.  काचबिंदू हा प्रामुख्याने आनुवंशिक आजार आहे. त्यामुळेच, तो रोखण्यासाठी व त्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने आम्ही आनुवंशिक घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काचबिंदूची जैविक प्रक्रिया तसेच नेमकी कोणती जनुके रोखून भविष्यात औषध तयार करण्यास मदत करतील, हे समजण्याबद्दल आशावादी आहोत, अशी प्रतिक्रिया संशोधन अहवालातील डॉक्टरांच्या चमूने दिली आहे.

टॅग्स :मुंबईडोळ्यांची निगाडॉक्टर