तुझं माझं जमेना अन् युतीशिवाय तरेना!, लोकमत सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 04:57 AM2019-08-19T04:57:30+5:302019-08-19T05:02:20+5:30

युती झाल्यास त्याचा फायदा भाजपाला जास्त होईल की शिवसेनेला ? या प्रश्नांवर या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मते ‘लोकमत’ने राज्यव्यापी सर्वेक्षणातून जाणून घेतली. त्याचे हे निष्कर्ष...

opinion articles on Bjp, Shiv Sena Alliance for Maharashtra Assembly polls | तुझं माझं जमेना अन् युतीशिवाय तरेना!, लोकमत सर्वेक्षण

तुझं माझं जमेना अन् युतीशिवाय तरेना!, लोकमत सर्वेक्षण

Next

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेनेचे नेते वेगवेगळ््या यात्रांच्या माध्यमातून जनतेत जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाजनादेश यात्रेने विदर्भात वातावरणनिर्मिती केली आहे, तर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षांचे नेते युती कायम राहील असे दावे करत असले तरी जागावाटपाचे गणित अद्याप सुटलेले नाही. हे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप व कॉँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवावी का? युती झाल्यास त्याचा फायदा भाजपाला जास्त होईल की शिवसेनेला ? या प्रश्नांवर या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मते ‘लोकमत’ने राज्यव्यापी सर्वेक्षणातून जाणून घेतली. त्याचे हे निष्कर्ष...

...तर भाजपचे ‘एकला चलो रे’!
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांना काही आठवड्यांचा अवधी असला तरी राजकीय आखाड्यात दाव्या-प्रतिदाव्यांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची युतीसंदर्भात नेमकी काय भूमिका आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ने २८८ मतदारसंघात व्यापक सर्वेक्षण केले व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार राज्यातील देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार व केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात असलेली भूमिका यामुळे भाजपाला राज्यात फायदा मिळणार असल्याचा कौल कार्यकर्त्यांनी दिला आहे. लोकसभेत शिवसेनेसोबत जरी युती झाली असली तरी आता येणाऱ्या विधानसभेत भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवावी, असा ५० टक्क्याहून अधिक कार्यकर्त्यांचा सूर आहे.


‘फॉर्म्युला’ काय असणार ?
जेथे विद्यमान आमदार आहेत त्या जागा सोडून इतर ठिकाणी ‘फिफ्टी-फिफ्टी’चा ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेकडून अद्याप जागांसंदर्भात ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.
अर्ध्या जागा लढण्यासंदर्भात त्यांचे नेते ठाम आहेत. विदर्भासह राज्यातील अनेक भागांत शिवसेनेची फारशी ताकद नाही. शिवाय मुंबईतदेखील भाजपने आता मुसंडी मारली आहे. अशा स्थितीत भाजपने ‘एकला चलो रे’ असाच निर्णय घ्यावा असा कार्यकर्त्यांचा कौल आहे.

काश्मीर ‘३७०’, ‘ट्रिपल तलाक’चा फायदा
केंद्र शासनाने ‘रालोआ’ची सत्ता परत स्थापन झाल्यानंतर अनेक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतील आहे. ‘ट्रीपल तलाक’ विधेयक मंजूर झाल्याने त्याचा फायदा होऊ शकतो, असे कार्यकर्त्यांना वाटते.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० संदर्भात उचललेल्या पावलामुळे जनसमर्थन भाजपकडे झुकले आहे, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचा भाजपला राज्यात फायदा होऊ शकतो.
देवेंद्र फडणवीस यांची ‘मिस्टर क्लिन’ ही प्रतिमादेखील जनतेला भावते आहे. त्यामुळे भाजपने स्वबळावरच निवडणूकांना सामोरे जावे, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

- मागील पाच वर्षांत भाजप-शिवसेनेमध्ये जो ताण-तणाव निर्माण झाला,आरोप-प्रत्यारोप झाले होते, ते पाहता स्वबळावरच निवडणूक लढवावी, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते.

भाजप कार्यकर्त्यांना काय वाटते?
55.92% - स्वबळावर
43.26% - युती हवी
0.82% - तटस्थ

---------------------
शिवसैनिक म्हणतात, वेगळी चूल नको रे बाबा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपासोबत निवडणूक लढल्यास शिवसेनेला फायदा होईल, असे अर्ध्याहून अधिक कार्यकर्त्यांचे मत आहे. परंतु ४२ टक्के कार्यकर्त्यांनी शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला हवी असा कौल दिला आहे. एकूण शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासंदर्भात द्विधा मन:स्थिती व काहीशा सावध पवित्र्यात असल्याचे ‘लोकमत’ने राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.
शिवसेनेच्या ४२.१५ टक्के कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकांत शिवसेनेने स्वत:चा वेगळा व स्वतंत्र मार्ग पत्करावा असा कौल दिला आहे. तर ५७.८५ टक्के कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणे शिवसेनेला फायद्याचे ठरणार नाही असे मत व्यक्त करत युतीच्या बाजूने मत दिले आहे.



भाजपसोबत का जावे?
भाजपसोबत आघाडी केल्यास व चांगल्या जागा मिळाल्यास शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यास फारशा अडचणी येणार नाहीत.
केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकांमुळे भाजपकडे मतदारांचा कल झुकण्याची शक्यता आहे. अशा स्थिती युतीच्या उमेदवारांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना युती व्हावी, असेच वाटत आहे. मतांचे विभाजन होऊ नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. युती झाल्यास शिवसेनेला फायदा होईल, असेही त्यांना वाटते.

स्वबळावर का लढवावी निवडणूक ?
जागावाटपादरम्यान भाजपाची भुुमिका व नेत्यांची वक्तव्ये लक्षात घेता शिवसेनेच्या पदरी कमी जागा येण्याची शक्यता.
भाजपात सुरू असलेल्या ‘इनकमिंग’मुळे शिवसेनेच्या जागांवरदेखील भाजप दावा करण्याची शक्यता. यामुळे हक्काच्या जागा गमाविण्याची कार्यकर्त्यांमध्ये भीती.
शिवसेनेचा आक्रमक पवित्रा व हिंदुत्ववादी भूमिका यामुळे मतदार सेनेच्या उमेदवारांनाच कौल देतील. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ केल्यास शहरी भागातील तरुण शिवसेनेकडे आकर्षित होण्याची शक्यता

- भाजपसोबत असल्यास मोदी सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाचा फायदा शिवसेनेला होईल, असे शिवसैनिकांना वाटते.

शिवसैनिकांना काय वाटते?
57.85% - युती हवी
42.15% - स्वबळावर
----------

युती झाली तर फायदा शिवसेनेचा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी भाजपा-शिवसेना या दोघांची युती झाली तर दोन्ही पक्षांपैकी कुणाला जास्त फायदा होईल, यासंदर्भातदेखील ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्रितपणे हा प्रश्न विचारण्यात आला. यातील समोर आलेले आकडे हे शिवसेनेला फायदा होणार असल्याचा कौल देणार आहेत.
लोकसभा निवडणूकांप्रमाणे दोन्ही पक्षांत युती झाली तर भाजपला फायदा होईल असे केवळ ४१.४८ टक्के कार्यकर्त्यांनाच वाटत आहे. तर शिवसेनेला फायदा होईल असा कौल ५८.५२ टक्के कार्यकर्त्यांनी दिलेले आहे. २०१४ च्या निवडणूकांत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. ती स्थिती आता येऊ नये अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे.

का होईल शिवसेनेला फायदा ?
कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर खिंडार पडले आहे. जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ निश्चित झाल्यानंतर यातील काही जागांंवर शिवसेना निश्चित दावा करु शकते व युतीच्या ताकदीचा फायदा त्या उमेदवारांना होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी विविध मुद्द्यांवर उचलेल्या पावलानंतर भाजपासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जर युती झाली तर शिवसेनेच्या उमेदवारांनादेखील जनतेच्या भावनांचा फायदा मिळेल.
शिवसेनेतर्फे मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित झाले नसले तरी देवेंद्र फडणवीस यांची ‘मिस्टर क्लिन’ ही प्रतिमा शिवसेनेच्या पथ्यावरच पडू शकते.

भाजपला का होईल नुकसान ?
सद्यस्थितीत स्वबळावरदेखील भाजप लढली तरी दीडशेहून अधिक जागा येतील, असा नेत्यांचा अंदाज आहे.सेनेची राज्यात अनेक ठिकाणी ताकद हवी तेवढी नाही. भाजपला या जागांवर स्वत:ची शक्ती पणाला लावून सेनेच्या उमेदवाराला निवडून द्यावे लागेल.
केंद्राच्या धोरणांमुळे राज्यात भाजपला पोषक वातावरणनिर्मिती झाली आहे. जर युती झाली तर भाजपला जिंकून येऊ शकणाºया जागादेखील शिवसेना व इतर घटक पक्षांसाठी सोडाव्या लागतील.

- भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते स्वबळासाठी आग्रही असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, त्यांना वाटते युतीचा फायदा शिवसेनेलाच अधिक होईल !

दोघांची युती झाली तर फायदा कुणाला?
41.48% - भाजपला फायदा
58.52% - शिवसेनेला फायदा

Web Title: opinion articles on Bjp, Shiv Sena Alliance for Maharashtra Assembly polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.