मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून विरोधकांची नौटंकी सुरू आहे, अशी टीका करतानाच राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक आणू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले.
आमचे सरकार आल्यानंतर आम्ही वेदांता कंपनीला जागा दाखवली होती. तेव्हाच आम्हाला समजले होते की, ते गुजरातला जाणार आहेत. त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र लिहिली, स्वत: जाऊन भेटलो. त्यांना चांगले पॅकेज देऊ, चांगली जागा देऊ, असेही सांगितले होते. पण, त्यांचा निर्णय आधीच झाला होता. आता महाविकास आघाडी नौटंकी करत आहे. पण, वेदांतापेक्षा चांगली गुंतवणूक राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल, असे फडणवीस म्हणाले.
गुजरात सरकारने एक ‘डॅशबोर्ड’ सुरू केला आहे, ज्यात राज्यातील सर्व प्रकल्पांबाबत सर्व माहिती दिली जाते. तसाच डॅशबोर्ड महाराष्ट्रात करता येईल का, यावर विचार सुरू आहे. तिकडे, हरियाणामध्येही ‘परिवार पहेचानपत्र’ योजना आहे, याशिवाय विविध राज्यात ज्या चांगल्या योजना सुरू आहे, त्या राज्यात कशा सुरू करता येतील, यावर आम्ही विचार करत आहोत, या गोष्टी पाहण्यासाठी मंत्रीदेखील संबंधित राज्यात जाणार आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी फेक माथाडी चळवळ फोफावत आहे. यामुळे माथाडी चळवळ बदनाम होत आहे. या फेक माथाडी तथा वसूली सम्राटांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला त्यांनी यावेळी दिले.
दांडिया तीन दिवस रात्री १२ पर्यंत चालणार!
- कोरोनानंतर धार्मिक उत्सव उत्साहात साजरे होत असताना नवरात्रोत्सवही धडाक्यात साजरा करता येणार आहेत.
- कोणतेही बंधन सरकारकडून लादले जाणार नाही.
- उलट दोन दिवसांऐवजी तीन दिवस रात्री १२ पर्यंत गरबा खेळण्यास परवानगी दिली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.