झवेरी बाजार स्थलांतरास सुवर्णकारांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 06:33 AM2019-03-09T06:33:13+5:302019-03-09T06:33:18+5:30
नवी मुंबईत सुवर्णकारांसाठी हबची निर्मिती करण्याची घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी झवेरी बाजार स्थलांतर करण्याचे वक्तव्य केले आहे.
मुंबई : नवी मुंबईत सुवर्णकारांसाठी हबची निर्मिती करण्याची घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी झवेरी बाजार स्थलांतर करण्याचे वक्तव्य केले आहे. त्यास झवेरी बाजारातील सुवर्णकार आणि कारागिरांनी विरोध केला. सरकारने या निर्णयात बदल न केल्यास सरकारविरोधात मतदान करण्याचा इशाराही सुवर्णकारांच्या गोल्ड स्मिथ को-आॅर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. त्यांनी सांगितले, नवी मुंबईत २१ एकर जागा देऊन सरकार सुवर्णकारांसाठी नवे हब निर्माण करीत आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र तेथे जाण्याची सक्ती झवेरी बाजारमधील सुवर्णकारांवर करू नये. ज्या सुवर्णकारांना तेथे जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. मात्र सरसकट सर्वांना स्थलांतरित करून येथील जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून सुवर्णकारांची बाजू समजून घ्यावी. अन्यथा लाखो कारागीर आणि त्यांची कुटुंबे येत्या लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करून रोष व्यक्त करतील, असे ते म्हणाले.
>उपासमारीची वेळ
आधीच जीएसटी, नोटाबंदीनंतर ५० टक्के कामगार बेरोजगार झाले आहेत. बाजार स्थलांतरित केल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.
झवेरी बाजारमधील ग्राहकवर्ग खरेदीसाठी नवी मुंबईला येणार नसल्याचा दावाही संघटनेने केला आहे. याबाबत कित्येकवेळा निवेदन दिल्यानंतरही मुख्यमंत्री चर्चेस तयार नसल्याचा आरोप संघटनेने केला.