धारावी पुनर्विकास प्रकरणी विराेधकांचा म्हाडावर मोर्चा; टी जंक्शनपासून होणार मोर्चाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:20 PM2023-10-10T14:20:29+5:302023-10-10T14:21:35+5:30
धारावीत मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदे गट वगळता सर्व राजकीय पक्ष मोर्चाच्या तयारीला लागले आहेत.
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीकरांची फसवणूक करण्यात येत असून, त्याविरोधात असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. टी जंक्शनपासून सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या वर मोर्चात धारावीकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती मोर्चाचे निमंत्रक आणि धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबूराव माने यांनी दिली.
धारावीत मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदे गट वगळता सर्व राजकीय पक्ष मोर्चाच्या तयारीला लागले आहेत. भिंती रंगविण्यात आल्या आहेत. त्याच्यावर ‘अदानीचे पाप धारावीकरांना ताप’, ‘नहीं देंगे नहीं देंगे चोरोंके हाथ में धारावी नहीं देंगे’, विकासाच्या नावाखाली धारावीकर बाहेर जाणार नाही, अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
सरकारपर्यंत विरोध पोहोचविण्यासाठी मोर्चा -
विकासाच्या नावाखाली ६५० एकरमधील २०० एकर जमिनीवर धारावीकरांना कोपऱ्यात बसविले जाणार आहे. १.१५ लाख झोपडीधारक धारावीत असून, प्रत्यक्षात ५८ हजार जणांचेच पुनर्वसन होणार आहे. उर्वरित झोपडीधारकांचे काय, असा सवाल केला जात आहे. प्रकल्प राबविण्यास धारावीकर विरोध करत आहेत. सरकारपर्यंत हा विरोध पोहोचविण्यासाठी हा मोर्चा आहे.
खा. विनायक राऊत, शेकापचे राजू कोरडे, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे, भाडेकरू संघाचे अनिल कासारे, नितीन दिवेकर, बसपाचे शामलाल जयस्वाल, आपचे संदीप कटके, समाजवादीचे अशपाक खान, सीपीएमचे नसीरुल शेख, सीपीआयचे वसंत खंदारे मोर्चात सहभागी होणार आहेत.