पेंग्विन मृत्यूमुळे शिवसेनेला विरोधकांनी घेरले
By admin | Published: October 27, 2016 04:14 AM2016-10-27T04:14:27+5:302016-10-27T04:14:27+5:30
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्युने विरोधकांना आयते कोलित सापडले आहे. बालहट्टापायी पेंग्विनचा बळी गेल्याची टीका करत विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या
मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्युने विरोधकांना आयते कोलित सापडले आहे. बालहट्टापायी पेंग्विनचा बळी गेल्याची टीका करत विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या युवराजांना लक्ष्य केले. त्यामुळे शिवसेनेच्या शिलेदारांचा तीळपापड झाला, मात्र पेंग्विनसाठी राणीच्या बागेतील सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाची होती, असा दावा करत पालिका प्रशासनाने शिवसेनेला सेफ केले. प्रशासनानेच असा डाव उधळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
दक्षिण कोरियाहून तीन महिन्यापूर्वी मुंबईत आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एकाचा रविवारी मृत्यु झाला. यावरून राजकीय वादळ उठले आहे. पालिकेच्या महासभेत याप्रकरणी चर्चा करून शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न फसल्यामुळे विरोधकांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत संधी साधली.
पेंग्विनसाठी राणीच्या बागेत सुविधा नसताना हे परदेशी पाहुणे आणले कशाला? त्यांना परत पाठवा, अशी सुचना मनसेचे गटनेता संदीप देशपांडे यांनी केली. पेंग्विनसाठी सुविधा तयार झाल्यानंतर त्यांना आणा, असा सल्ला सदस्यांनी दिला.
राणीच्या बागेत यापूर्वी १२ काळवीट मृत्युमुखी पडले आहेत. त्याची चौकशी झाली, मात्र कोणावरच कारवाई झाली नाही, मग पेंग्विनच्या मृत्युने काय फरक पडणार? असा टोला काँग्रेसच्या वकारुन्निसा अन्सारी यांनी लगावला.
या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली. पेंग्विनच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? चांगली सुविधा नसल्यामुळेच पेंग्विनला प्राणास
मुकावे लागले, असा जोरदार हल्ला करत आक्रमक विरोधकांनी शिवसेनेला मोठ्या प्रमाणात घायाळ केले. (प्रतिनिधी)