हुसैनी दुर्घटनेप्रकरणी विरोधकांची श्वेतपत्रिकेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:21 AM2017-09-01T05:21:18+5:302017-09-01T05:21:26+5:30
हुसैनी इमारत दुर्घटनेकडे गंभीरतेने पाहून एक रोडमॅप तयार करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे सर्व विरोधक करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली आहे
चेतन ननावरे
हुसैनी इमारत दुर्घटनेकडे गंभीरतेने पाहून एक रोडमॅप तयार करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे सर्व विरोधक करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली आहे. ते म्हणाले की, सरकारबाबत लोकांमध्ये विश्वास नाही. आघाडी सरकारने संक्रमण शिबिरे तयार केली, त्यांचे काय केले, हा प्रश्न आहे. म्हणूनच सरकारने विरोधकांना चर्चेसाठी बोलवावे. नाहीतर सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी विरोधकांना कोर्टात जावे लागेल. मुळात पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी पावसाळ्यात या ठिकाणी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याची गरज होती. अधिकाºयांवर अवलंबून राहिल्यानेच दुर्घटना घडल्याचा आरोप अहिर यांनी केला.
आढावा घेऊनच मदत जाहीर करणार! - जिल्हाधिकारी
मदतकार्य सुरू असून, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊनच मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी अहवाल पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मेहता म्हणाल्या की, इमारत कोसळण्याचे नेमके कारण शोधले जाईल. शिवाय रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी पाठवलेल्या नोटीसचाही अभ्यास केला जाईल. माणुसकीच्या दृष्टीकोनातून काही मदत करता येईल का? यासंदर्भातील आढावा घेऊनच मदतीसाठी अहवाल पाठवला जाईल.
जबाबदारी स्वीकारली - मेहता
हुसैनी इमारत कोसळली. अनेकांना नाहक जीवाला मुकावे लागले. इमारत दुर्घटनेची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले. दरम्यान, इमारतीतील १३ भाडेकरुंपैकी सात कुटुंबांना २०१३-१४ मध्येच सुरक्षित ठिकाणी स्थालंतरित केले होते. म्हाडानेही २०११ मध्ये दोनदा नोटीस पाठविली होती. पीडितांना पालिका, मुंबई पोलीस, म्हाडा यांच्या बरोबरीने ट्रस्टनेही सहकार्य केल्याचा बचाव सैफी बुºहानी ट्रस्टने केला. आदेशाची वाट पाहू नका!
- सचिन अहिर
सेक्शन ९५ ए नुसार गृहनिर्माण मंत्र्यांना स्वत:ला सक्तीने घरे खाली करण्याचे अधिकार असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहू नये, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी प्रकाश मेहता यांना लक्ष्य केले आहे. धोकादायक इमारतींसाठी सरकारने एक सॉफ्टवेअर करायला हवे होते, असे ते म्हणाले.दोषींवर कारवाई - सुभाष देसाई
दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही सकाळी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. ते म्हणाले की, प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. दक्षिण मुंबईत बहुसंख्य इमारती धोकादायक आहेत. त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता तातडीने सोडविला जाईल. दुर्घटना झालेली इमारत ही धोकादायक असल्याने काही लोकांनी आधीच घरे रिकामी केली होती. पण काही कुटुंबे इमारतीत राहत होती. तेच लोक अपघातात सापडल्याचा दावा देसाई यांनी केला आहे.