कायमस्वरूपी थकबाकीदार वीज ग्राहकांना संधी; ‘स्पेशल अॅमनेस्टी स्कीम २०२३’ अंतर्गत संपूर्ण व्याज माफ
By सचिन लुंगसे | Published: November 18, 2023 12:32 PM2023-11-18T12:32:54+5:302023-11-18T12:34:02+5:30
ही सवलत सुरवातीला ११ नोव्हेंबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२४ या एका वर्षासाठी असणार आहे.
मुंबई - महावितरणच्या भिवंडी फ्रॅंचायजी भागातील थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्यासाठी महावितरणने अतिशय फायदेशीर व उपयुक्त अशी ‘स्पेशल अॅमनेस्टी स्कीम २०२३’ ही विशेष योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मूळ थकबाकीच्या ११० टक्के रक्कम भरल्यास त्यावरील संपुर्ण व्याज माफ करण्यात येणार आहे. यामुळे भिवंडीतील थकबाकीदार ग्राहकांना नवीन वीज जोडणी घेणेही आता सुलभ होणार आहे. ही सवलत सुरवातीला ११ नोव्हेंबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२४ या एका वर्षासाठी असणार आहे.
महावितरणने जानेवारी २००७ मध्ये भिवंडीत वीज वितरणासाठी टोरंट पॉवर या कंपनीची नियुक्ती केली होती. तेव्हापासून थकबाकी पोटी अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. अशा ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरणे शक्य न झाल्याने त्यांना नवीन वीज जोडणी घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाल्याने त्यावर तोडगा म्हणून महावितरणने ही विशेष योजना भिवंडीतील थकबाकी पोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या ग्राहकांसाठी तयार केलेली आहे.
लाभार्थी ग्राहकांना त्यांची मूळ थकबाकीची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम याची माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश टोरंट पॉवर कंपनीला देण्यात आले असून अशा ग्राहकांशी संवाद साधण्याच्या सूचनाही टोरंट पॉवर कंपनीला देण्यात आलेल्या आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी टोरंट पॉवर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन आपण योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्याबाबत लेखी पत्र देऊन त्याची पोच घ्यावी. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे
मालेगाव, शिळ, मुंब्रा व कळवा वितरण फ्रेंचाइझीच्या करारात या सवलतीचा समावेश या अगोदरच करण्यात आलेला आहे. तथापि १६ वर्षांपूर्वी झालेल्या भिवंडीच्या वितरण फ्रेंचाइझीच्या करारात या सवलतीची तरतूद करण्यात आलेली नसल्याने भिवंडीसाठी ही 'स्पेशल अॅमनेस्टी स्कीम २०२३' तयार करण्यात आलेली आहे.
महावितरणने शिळ, मुंब्रा व कळवा वितरण फ्रेंचाइझीसाठी कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर (मोबा. ८८७९६२५१११) व भिवंडीसाठी कार्यकारी अभियंता सुनील माने (मोबा. – ८८७९६२५००५) या दोन स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. टोरंट पॉवर कंपनीकडून जर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण झाले नाही तर शिळ, मुंब्रा व कळवा येथील ग्राहकांनी मंगळवारी व शुक्रवारी 'नोडल ऑफिस, शिळ-मुंब्रा-कळवा वितरण फ्रेंचाइझी, टोरंट पॉवर प्लग पॉईंट, अरिहंत आरोही, तळ मजला, कल्याण-शिळ रोड, पाडळे गाव, शिळ, ठाणे - ४००६१२ येथे तर भिवंडी येथील ग्राहकांनी बुधवारी व गुरुवारी 'नोडल ऑफिस, भिवंडी वितरण फ्रेंचाइझी, एमएसईबी कॉलनी, भिवंडी सब स्टेशन शेजारी, कल्याण रोड, भिवंडी - ४२१३०२' येथे सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.१५ या कार्यालयीन वेळेत नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे महावितरणने आवाहन केले आहे.