विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:51 AM2018-12-11T00:51:08+5:302018-12-11T00:51:22+5:30

मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना, अमेरिकेतील पेन्सिलव्हेनिया स्टेट येथील अनेक नामांकित उच्च शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Opportunities for higher education for university students | विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना, अमेरिकेतील पेन्सिलव्हेनिया स्टेट येथील अनेक नामांकित उच्च शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पेन्सिलव्हेनियातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणे अधिक सोयीचे होणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ आणि कॉमनवेल्थ ऑफ पेन्सिलव्हेनिया स्टेट सीस्टम ऑफ हायर एज्युकेशन यातील शैक्षणिक भागीदारीसाठी इरादा पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रोफेसर सुनिल भिरूड यांच्यासह अनेक प्राध्यापक, मान्यवर उपस्थित होते.

या शैक्षणिक भागीदारीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीला अनुसरून विशेष क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, कॉम्प्यूटर सायन्स, बायोटेक्नोलॉजी, इंजिनीअरिंग, फॉरेन्सिक सायन्स, सायबर डिफेन्स आणि जनरल सायन्स या क्षेत्रातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल.
या इरादा पत्राच्या आधारावर दोघांमध्ये अभ्यासक्रमांतील देवाण-घेवाण, अध्यापन पद्धती, फॅकल्टी ट्रेनिंग, करिकुलम मॅपिंग, समर स्टडी प्रोग्राम, आॅनलाइन सर्टिफिकेट प्रोग्राम, फिल्ड स्टडी प्रोग्राम आणि स्टुडंट्स एक्स्चेंज प्रोग्राम इत्यादी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना सल्ला-समुपदेशन, नावनोंदणीची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
प्राध्यापक आणि प्रशासकीय प्रशिक्षणाच्या सोयीबरोबरच शैक्षणिक नेतृत्वासाठी संधी उपलब्ध होणार आहे, तसेच मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू होत असलेल्या इक्युबेशन सेंटरसाठीही नॅनोसायन्स, बायोलॉजिकल सायन्स आणि फार्मासिट्युकल सायन्स या क्षेत्रातील सहकार्याच्या संधीने नवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

पेन्सिलव्हेनिया स्टेट सीस्टम आॅफ हायर एज्युकेशन हबमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधीबरोबरच विविध उपक्रम राबविले जाणार असल्याने, मुंबई विद्यापीठ आणि कॉमनवेल्थ आॅफ पेन्सिलव्हेनिया यांच्यातील शैक्षणिक भागीदारीमुळे एका नव्या पर्वाचा प्रारंभ होत आहे.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.

Web Title: Opportunities for higher education for university students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.