Join us

दहावी पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये अर्जाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:07 AM

८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध : ५ जानेवारीला गुणवत्ता यादीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयटीआयच्या ४ फेऱ्यांनंतर राज्यात ...

८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध : ५ जानेवारीला गुणवत्ता यादी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयटीआयच्या ४ फेऱ्यांनंतर राज्यात आयटीआयच्या ८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. लवकरच समुपदेशन फेरीला सुरुवात होणार असून, त्या आधी दहावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी चार जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, ५ जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

याबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ही फेरीही समुपदेशन फेरीप्रमाणे असून, थेट संस्थास्तरावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

राज्यातील सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्या. त्यानंतर, समुपदेशन फेरी गुरुवारी संपली. याचदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी म्हणून शुक्रवारपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सुरुवातीला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येईल, असे संचालनालयाने स्पष्ट केले. ही फेरीही समुपदेशन फेरीप्रमाणे असून, थेट संस्थास्तरावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील जागा व प्रवेश फेरीनंतर खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरता येतील. ही प्रक्रिया ८ ते १५ जानेवारीपर्यंत असणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* अशी असेल समुपदेशन फेरी

२ जानेवारी - रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार

१ ते ४ जानेवारी - विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधून संबंधित संस्थेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे

५ जानेवारी - गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार

६ व ७ जानेवारी - गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप. याचदरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणी, शुल्क भरून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.