पोलिसांच्या पाल्यांना रोजगाराची संधी

By admin | Published: April 6, 2015 04:35 AM2015-04-06T04:35:40+5:302015-04-06T04:35:40+5:30

महानगरातील दीड कोटींपेक्षा अधिक नागरिकांच्या जीवित व वित्त रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या ५० हजारांपेक्षा जास्त पोलिसांसाठी एक खूशखबर आहे.

Opportunity for employment of police personnel | पोलिसांच्या पाल्यांना रोजगाराची संधी

पोलिसांच्या पाल्यांना रोजगाराची संधी

Next

जमीर काझी, मुंबई
महानगरातील दीड कोटींपेक्षा अधिक नागरिकांच्या जीवित व वित्त रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या ५० हजारांपेक्षा जास्त पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. अवेळी असणारी ड्युटी व बंदोबस्तामुळे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड लक्षात घेऊन आयुक्तालयाने पोलिसांच्या सुशिक्षित व पात्र पाल्यांसाठी घसघशीत पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मुंबई कौन्सिलिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेंटरतर्फे ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, नियुक्तीनंतर त्यांना सुरुवातीला दर महिन्याला ३१ हजार रुपये वेतन मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये त्यांना विविध ठिकाणी सुरक्षा प्रतिनिधी (सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह) म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
कोणत्याही शाखेचा पदवीधर व राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनएसीसी) सी प्रमाणपत्र एवढीच या निवडीसाठीची शैक्षणिक अट आहे. पात्र ठरणाऱ्यांना सशस्त्र दलाकडून (एल ए) मोफत मार्गदर्शन दिले जाईल. तसेच कंपनीकडून प्रशिक्षण देऊन पुढील चाचण्या घेतल्या जातील. विविध ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी या पदावर शेकडो उमेदवार भरण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने या ठिकाणी पोलिसांना सदैव तत्पर राहावे लागते. विशेषत: २६/११च्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याने पोलिसांवर कामाचा ताण वाढत राहिला
आहे.
त्याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत आहे. त्यांच्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने बेरोजगार व वाममार्गाला लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच वरळी येथील सशस्त्र विभागात पाल्यांसाठी कौन्सिलिंग व आणि प्लेसमेंट सेंटर कार्यरत आहे.
सध्या या ठिकाणी रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पावर सुरक्षा प्रतिनिधीपदाची चांगली योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत अर्ज द्यावयाचा असून तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्यांना त्याबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

Web Title: Opportunity for employment of police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.