Join us

साखर निर्यातीला संधी, तरीही कारखान्यांचे ‘आस्ते कदम’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 6:39 AM

१२ लाख टनांचे करार : प्रत्यक्षात २.१६ लाख टन साखरेची निर्यात

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर साखरेची निर्यात हाच उतारा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता भारताला निर्यातीची संधीही चांगली आहे. ऑक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे सहा लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. त्यातील अवघी दोन लाख १५ हजार ९४९ मेट्रिक टन साखर  ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निर्यातीसाठी बाहेर पडली आहे. डिसेंबरमध्ये आणखी तीन लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. हा वेग वाढविण्यासाठी आणि निर्यात कोटा पूर्ण करण्यासाठी कारखान्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

आंतरराष्टÑीय बाजारातील सर्वांत मोठा साखर निर्यातदार देश असलेल्या ब्राझीलने यंदा साखरेचे उत्पादन सुमारे १०० लाख टनांनी कमी केले आहे. हा ऊस त्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळविला आहे. त्याचबरोबर थायलंड हाही एक मोठा साखर निर्यातदार देश आहे. तेथील साखरेचे उत्पादनही यंदा घटलेले आहे. याउलट भारतात गत हंगामातील १०० लाख टन साखर नवा हंगाम सुरू होण्याच्या वेळेस शिल्लक होती. शिवाय या हंगामातही ३१५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेले ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण करणे कारखानदारीसाठीही आवश्यक आहे. सध्या न्यूयॉर्कच्या वायदे बाजारात साखरेचा दर मार्चसाठी १२.६५ सेंट प्रतिपौंडच्या आसपास आहे. म्हणजेच प्रतिकिलो १९ रुपयांच्या जवळपास दर मिळतो. त्यात केंद्राकडून मिळणारे अनुदान जमा केल्यास हा दर २८ रुपयांच्या आसपास जातो. गेल्या अडीच महिन्यांत सुमारे बारा लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. ब्राझील आणि थायलंडचे साखर उत्पादन घटल्याने साखर आयातदार देश भारताकडे वळू लागले आहेत. त्यामध्ये चीनने सर्वाधिक स्वारस्य दाखवून २०लाख टन साखर खरेदीची तयारी दाखविली आहे. याशिवाय शेजारील श्रीलंका, बांगलादेश, नेपाळसह इंडोनेशिया, मलेशिया, इराण, युनायटेड अरब अमिरात, आदी देशांची साखरेची गरज सुमारे १६० लाख टनांची आहे. त्यामुळे भारताला ५० लाख टनांचे लक्ष्य गाठणे सहज शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.साखर निर्यातीची गती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संथ दिसत असली, तरी तिला आता गती आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत आणखी तीन लाख टन साखरेची निर्यात होऊन हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांतील निर्यातीचा आकडा पाच लाख १५ हजार टनांवर जाण्याची शक्यता आहे.- प्रफुल्ल विठ्ठलानी, अध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन

टॅग्स :साखर कारखानेमुंबई