Join us

पीजी-मेडिकल करण्याची अधिक विद्यार्थ्यांना संधी; जागा वाढल्या, ७ महाविद्यालयांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:43 AM

यात महाराष्ट्रातील सात सरकारी-खासगी-डीम्ड महाविद्यालयांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशभरात विविध सरकारी-खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एमएस, एमडी, डीएम असे वैद्यकीय पदव्युत्तर पदवीचे (पीजी) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) मान्यता दिली आहे. त्यामुळे मेडिकल-पीजीच्या जागा वाढणार आहेत. यात महाराष्ट्रातील सात सरकारी-खासगी-डीम्ड महाविद्यालयांचा समावेश आहे.

एमडी इमर्जन्सी मेडिसिन, एमडी फॉरेन्सिक मेडिसिन, एमडी-कम्युनिटी मेडिसिन, एमडी-रेडिओ-डायग्नोसिस, सायकॅट्री, पॅथलॉजी, नेफ्रॉलॉजी, ईएसपीएन, रेडिओलॉजी, ईएनटी, जनरल सर्जरी अशा विषयांत देशातील विविध संस्थांना १५४ अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली, तर ५० अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या मेडिकल-पीजीच्या ७० हजार ६०० जागा देशभर आहेत. त्यात या वाढीव जागांची भर पडणार आहे.

नवीन विषय सुरू करण्यास मान्यता

बारामतीचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईचे के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, पिंपरी-चिंचवड पालिका महाविद्यालय, आंबेजोगाईचे एसआरटीआर मेडिकल कॉलेज, सोलापूरचे डॉ. वैशंपायन मेमोरिअल मेडिकल कॉलेज, जळगावचे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि अमरावतीचे पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडिकल कॉलेज या राज्यातील सात सरकारी-खासगी-डीम्ड महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्र