आरटीई अर्जातील चुका सुधारण्यास संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:14 AM2019-05-28T06:14:03+5:302019-05-28T06:14:08+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी अर्ज केल्यानंतर त्यात चुका आढळून आल्यास त्या सुधारण्याची संधी विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहे. ही दुरुस्ती २९ मे ते ४ जूनदरम्यान करता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
आरटीई प्रवेशाची पहिली सोडत ८ एप्रिल रोजी पार पडली असून, पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या सोडतीच्या प्रतीक्षेत पालक असले, तरी अर्जात दुरुस्ती करण्याच्या सुविधेमुळे सोडतीला उशीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरटीईसाठी आॅनलाइन अर्ज भरताना गुगल लोकेशन योग्य ठिकाणी नव्हते. त्यामुळे घरापासून शाळेचे अंतर चुकीचे भरण्यात आले आहे. घरापासून शाळेचे अंतर एक किलोमीटर असताना बलूनद्वारे ते अंतर एकपेक्षा अधिक दाखविण्यात आले आहे, तर अनेक ठिकाणी बलूनचे लोकेशन व्यवस्थित दिसत नाही. अशा
तांत्रिक बाबींमुळे अर्जात चुका झाल्याचे समोर आले आहे.
कागदपत्रे पडताळणी समितीकडूनही अनेक पालकांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. याशिवाय काही पालकांकडून नकळत चुकीची माहिती भरण्यात आली होती. या माहितीमुळे अनेक मुलांना प्रवेश जाहीर झाला नाही. तसेच कागदपत्रांची पडताळणी करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पालक आणि संघटनांकडून अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
>...यांनाच करता येईल अर्जात दुरुस्ती
ज्या विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरला आहे, मात्र निश्चित (कन्फर्म) केला नाही त्यांनाच अर्जात दुरुस्तीची संधी मिळणार आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांचे नाव सोडतीत आले, मात्र काही अडचणींमुळे ते प्रवेश घेऊ शकले नाहीत अशा पालकांच्या तक्रारींची खात्री पडताळणी समितीने करून त्यात दुरुस्ती करावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. तांत्रिक चूक नसल्यास आणि पडताळणी समितीने अपात्र ठरविलेल्या चुकांची दुरुस्ती करू नये, असेही नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेदरम्यान पालकांना नवीन अर्ज भरता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी भरलेल्या आॅनलाइन अर्जात दुरुस्ती करण्यासाठीची संधी देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक सुनील चौहान यांच्याकडून निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेतील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी करणे अनिवार्य आहे. या दुरुस्तीनंतर आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत जाहीर होणार आहे.
ही प्रक्रिया होण्यासाठी वेबपोर्टलमध्ये बदल होणे आवश्यक आहे. हे बदल झाल्यानंतर ‘आरटीई’ची दुसरी लॉटरी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. यामुळे साहजिकच प्रवेशाच्या दुसºया सोडतीला उशीर होणार आहे. त्यामुळे पालकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.