Join us

व्याख्याते गौर गोपाळ दास यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 2:21 AM

लॉकडाऊनमुळे प्रत्येकाच्या कार्यपध्दतीवर निर्बंध आले आहेत. आयुष्य पुन्हा पूर्वींसारखे कधी जगता येईल, याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांना भविष्याच्या चिंतेने ग्रासले आहे. वातावरण कमालीचे अस्थिर असले तरी जीवनात फक्त बदलच हाच स्थिर असतो, हे वास्तव प्रत्येकानेच समजून घ्यायला हवे. लोकमत समुहातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुनश्च भरारी’ या वेबिनार सीरिजच्या माध्यमातून हेच बदल स्वीकारून नव्या सकारात्मक ऊर्जेने भविष्यातील वाटचाल करण्याची प्रेरणा दिली जात आहे. याच मालिकेत २१ मे रोजी ‘फक्त बदलच स्थिर का आहे?’ या विषयावर जागतिक दर्जाचे लाइफस्टाइल कोच आणि आयुष्य जगण्याची उमेद जागविणारे व्याख्याते गौर गोपाळ दास यांचे मौलिक विचार ऐकण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत’च्या वाचकांना मिळणार आहे.

लॉकडाऊनमुळे प्रत्येकाच्या कार्यपध्दतीवर निर्बंध आले आहेत. आयुष्य पुन्हा पूर्वींसारखे कधी जगता येईल, याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतरच्या काळातील ‘न्यू नाँर्मल’ आयुष्याच्या दिशेने प्रत्येकाला वाटचाल करावी लागणार आहे. हे बदल आपण कसे स्वीकारायचे? मनात निर्माण झालेली भीती कशी दूर करायची? यासारखे असंख्य प्रश्न प्रत्येकालाच सतावत आहेत. २००८-०९ या काळात आर्थिक मंदीमुळेही मोठे संकट कोसळले होते. त्यावेळी सर्व प्रकारच्या व्यवहारांना उतरती कळा लागली होती. मात्र, त्यानंतर जग पूर्वपदावर आले. कोरोनामुळेसुध्दा आपल्या कार्यपध्दतीत आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत.

घरातून काम करण्याची पद्धत स्वीकारणे अपरिहार्य आहे. आॅनलाईन शिक्षण ही काळाची गरज ठरणार आहे. या संकटामुळे जे सामाजिक आणि मानसिक दुष्परिणाम होत आहेत, ते दूर करण्यासाठी आॅनलाईन कार्यशाळा आणि कार्यक्रमही होत आहेत. अनेकांनी हे बदल स्वीकारले आहेत, तर काही जण ते स्वीकारण्याच्या मार्गावर आहेत. लोकमत माध्यम समूहाला हा विश्वास आहे, की आयुष्यात फक्त बदल हाच एकमेव स्थिर घटक आहे. त्यातूनच दीर्घकालीन सकारात्मक बदल दिसून येतील. हेच बदल घडवून आणण्याची प्रेरणा देण्यासाठी गौर गोपाळ दास हे ‘लोकमत’च्या वाचकांच्या भेटीला येत आहेत.

गेल्या दोन दशकांहून जास्त काळ ते भारत आणि परदेशातील अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये आपले मौलिक विचार मांडत आहेत. तीन वेळा त्यांनी ब्रिटिश संसदेत, संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेतही व्याख्याने दिली आहेत. त्यांचे मार्गदर्शन ‘लोकमत’च्या वाचकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.वेबिनार २१ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.नोंदणीसाठी लिंक https://bit.ly/2LF3C8M.

टॅग्स :लोकमत