मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम आता वेग घेणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे एक लाख रोजगारांची निर्मिती होईल, असा दावा महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केला आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत बांधकामाचे कंत्राट दिले जाणार आहे. त्यानंतर नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. कोस्टल रोडमुळे कार्बन डायआॅक्साईड उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल; तसेच ५४ हेक्टर हरितपट्टा निर्माण होणार आहे.यावर जलद बस वाहतुकीसाठी मार्गिकाही ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत या मार्गिकेचाही वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे एक लाख रोजगार निर्मिती होईल, असा दावाही आयुक्तांनी केला. त्याचबरोबर रस्ते विभागासाठी पालिकेने एक हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात नव्या पुलांचे बांधकाम, रस्त्यांची दुरुस्ती अशी कामे करण्यात येतील.जोडरस्त्यासाठी१०० कोटीगोरेगाव-मुलुंड या जोड रस्त्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या आदेशानुसार वर्षभर पर्यावरणीय अभ्यास करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील नाहूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील काम सुरू करण्यात आले असून नाहूर रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे रुंदीकरणही करण्यात येणार आहे.खड्ड्यांसाठी विशेष प्लांट- पावसाळ्यातील खड्डे दुरुस्त करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान मुंबई पालिका स्वत: तयार करणार आहे.- वारंवार खड्डे पडणारी ठिकाणे निश्चित करून दुरुस्तीच्या वेळीच कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार आहे.- पुलांच्या विस्तारासाठी आणि नव्या पुलांच्या बांधकामासाठी ४६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.- हँकॉक पुलाचे बांधकामही लवकरच सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे.
कोस्टल रोड उघडणार रोजगाराची द्वारे; एक लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचा आयुक्तांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:28 AM