Join us  

मेट्रो जनसुनावणीवेळी प्रश्न मांडण्याची संधी

By admin | Published: May 03, 2016 1:22 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मेट्रो २ आणि मेट्रो ७ साठी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. १२ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील प्राधिकरणाच्या

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मेट्रो २ आणि मेट्रो ७ साठी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. १२ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील प्राधिकरणाच्या मुख्यालयात ही जनसुनावणी सकाळी १० वाजता होणार आहे. या जनसुनावणीवेळी मुंबईकरांना दोन मार्गांसंदर्भातील पर्यावरणासह सामाजिक प्रश्नांबाबतच्या हरकती आणि सूचना प्राधिकरणासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाच्या बांधकामाला आॅक्टोबर महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी स्थानिकांच्या यासंदर्भातील हरकती व सूचना ऐकण्यासाठी प्राधिकरणाने जनसुनावणीचे आयोजन केले आहे. प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो २ या दहिसर ते डी.एन. नगर आणि मेट्रो ७ या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मार्गाला सरकारने मान्यता दिली आहे. आॅक्टोबर महिन्यापासून या मार्गांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी या मेट्रो मार्गाशी निगडित पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न मांडण्याची संधी मुंबईकरांना जनसुनावणीवेळी दिली जाणार आहे.अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा १६ किलोमीटर लांब मेट्रो ७ उन्नत मार्ग आणि त्यावरील १६ स्थानकांचे बांधकाम तीन पॅकेजमध्ये करण्यासाठी मागवलेल्या निविदांना एमएमआरडीएच्या बैठकीत यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. तसेच यासाठी तीन यशस्वी कंत्राटदारांची शिफारसही करण्यात आली आहे. यशस्वी कंत्राटदार १६ स्थानके व दरम्यानचा १६.५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग ३० महिन्यांत बांधून पूर्ण करणार आहेत. तर मेट्रो २ या दहिसर ते डी.एन. नगर या १८ किलोमीटर मार्गावर एकूण १७ स्थानके असणार असून, या मार्गावरून भविष्यात सुमारे चार लाख प्रवास करतील, असा अंदाज प्राधिकरणाने वर्तवला आहे.