Join us

मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकणाऱ्यांना संधी?, विधानपरिषदेवरुन नाथाभाऊंची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 4:14 PM

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे

मुंबई - विधानपरिषदेसाठी माझं, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस दिल्ली दरबारी झाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र, आमच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं समजल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेचं तिकीट देण्यात आल्याबद्दलही खडसेंनी नाराजी व्यक्त केली. पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, भाजपात आल्यानंतर आता त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगत खडसेंनी पक्षाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.  

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत, तर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपाचे नेते होते. अजित गोपछेडे हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या चारही नेत्यांना भाजपाकडून संधी मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची ही निवडणूक होत आहे. मात्र, तत्पूर्वीच एकनाथ खडसेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. 

भाजपाकडून विधानपरिषदेसाठी नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. निष्ठावंताना डावलून पक्षाविरुद्ध कार्य करणाऱ्यांना पक्षाने तिकीट दिले आहे. मी ४० ते ४२ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे. पक्षाच्या जडणघडणीत आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे एकनिष्ठ म्हणून आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपाविरोधी काम करणारे, गो बॅकच्या घोषणा देणाऱ्या पडळकरांना संधी देण्यात आली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलेल्या मोहितेपाटलांना पक्षानं तिकीट दिलं. त्यामुळे, भाजपा नेमकं कोणत्या दिशेनं चाललाय, हेच समजत नाही, असे म्हणत एकनाथ खडसेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. 

रेल्वे दुर्घटनेचं वृत्त वाचून यातना झाल्या, शरद पवारांनी सरकारला काही सूचना केल्या

...अन् फुटपाथवर झोपलेल्या पोलिसांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे, मिळाला हक्काचा निवारा

टॅग्स :एकनाथ खडसेनिवडणूकभाजपादेवेंद्र फडणवीसविधान परिषद निवडणूक