Join us  

इंजिनिअरिंग डिप्लोमातही एआय, रोबोटिक्स शिकण्याची संधी

By रेश्मा शिवडेकर | Published: June 26, 2024 9:57 PM

मुंबई-इंग्रजीसोबतच मराठीतही शिकण्याची संधी, एआय, रोबोटिक्ससारखे नव्या तंत्रयुगाचे अभ्यासक्रम यांमुळे इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान,  आर्किटेक्चर डिप्लोमाला यंदाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभतो ...

मुंबई-इंग्रजीसोबतच मराठीतही शिकण्याची संधी, एआय, रोबोटिक्ससारखे नव्या तंत्रयुगाचे अभ्यासक्रम यांमुळे इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान,  आर्किटेक्चर डिप्लोमाला यंदाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. आतापर्यंत डिप्लोमाच्या प्रवेशाकरिता १ लाख २७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र जातीचा, उत्पन्नाच्या दाखल्यासह अन्य कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असल्याने प्रत्यक्षात १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनाच प्रवेशाकरिता शुल्क भरता आले आहे. म्हणून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना ९ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पॉलिटेक्निक म्हणून ओळखल्या जाणाऱया दहावीनंतरच्या या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता २९ मेपासून नोंदणी सुरू आहे. २५ जून ही अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही केवळ आवश्यक कागदपत्रे नसल्याने शुल्क भरून प्रवेश प्रक्रियेतील सहभाग निश्चित करता आलेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

तीन प्रवेश फेऱया

या प्रवेशांकरिता अंतिम गुणवत्ता यादी १६ जुलैला जाहीर केली जाईल. त्यानंतर राज्याच्या स्तरावर तीन केंद्रीभूत प्रवेश फेऱ्या (कॅप) घेण्यात येतील. dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रवेशाचे तपशील पाहता येतील.

अभियांत्रिकी पदविका संस्था - ३९०

उपलब्ध जागा - १ लाख ५ हजार

इंजिनिअरिंग डिप्लोमाचे वैशिष्ट्ये

-मराठी-इंग्रजीतून (द्विभाषिक) माध्यमातून शिकण्याची संधी

-औद्योगिक क्षेत्रांच्या गरजा ओळखून सुरू झालेले नवे अभ्यासक्रम. उदा. एआय, डेटा सायन्स, रोबोटिक्स, आयओटी.

-विद्यार्थी-शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार

-प्रवेशासाठी सीईटीची गरज नाही

-तीन वर्षाचा अभ्यासक्रम कालावधी

-औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी

-पदविका शिक्षणानंतर इंजिनिअरिंग पदवीच्या दुसऱया वर्षाला थेट प्रवेश

गेल्या काही वर्षात प्रवेशात झालेली वाढ

२०१८-१९ - ४१ टक्के

२०१९-२० - ५० टक्के

२०२०-२१ - ६० टक्के

२०२१-२२ - ७० टक्के

२०२२-२३ - ८५ टक्के

२०२३-२४ - ८७ टक्के

सीईटीचा ताण टाळण्यासाठी...

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. पदविका केलेल्या विद्यार्थांना पुढे अभियांत्रिकीच्या पदवीला दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. सीईटीचा ताण टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी पदविकेचा मार्ग निवडतात. 

टॅग्स :महाविद्यालयविद्यार्थी