Join us

शिंदे साहेबांना सांगा, नका लावू शाळांना टाळा; ‘त्या’ शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 11:51 AM

कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या गेल्या सरकारच्या निर्णयाला शिक्षक संघटना व अनेक मुख्याध्यापकांचाही विरोध आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : राज्यातील ० ते २० पटसंख्येच्या शाळांची माहिती शिक्षण विभागाकडून मागविल्यानंतर त्या बंद करण्याचे संकेत मिळाल्यामुळे अनेक स्तरांतून या निर्णयाला विरोध होत आहे. यामुळे अनेक गरीब व दुर्गम भागातील विद्यार्थी शाळाबाह्य होतील, अशी भीती तज्ज्ञांमधून आणि शिक्षक, मुख्याध्यापकांमधून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्यात छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी शाळाबंदीच्या निर्णयाला तीव्र विरोध करून त्याचे पोस्टर्स तेथे दाखल झालेल्या १०० हून अधिक गाड्यांवर चिकटवले. 

बीकेसी येथे राज्याच्या विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते गाड्या भरून दाखल झालेले आहेत. याच गाड्यांवर पोस्टर्स लावून छात्र भारती संघटनेकडून शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. याशिवाय शिंदे साहेबांना सांगाल का, शाळाबंदी करू नका, जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा, नका लावू शाळांना टाळा, अशा घोषणांनी सभेआधीच बीकेसी परिसर दणाणून सोडला. 

घराजवळील शाळांमध्येच मिळावे शिक्षण 

- आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील शाळांमध्येच शिक्षण मिळाले पाहिजे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या गेल्या सरकारच्या निर्णयाला शिक्षक संघटना व अनेक मुख्याध्यापकांचाही विरोध आहे. 

- वाहतूक भत्ता किंवा वाहतुकीची सुविधा देण्याच्या नावाखाली शाळा बंद करणे योग्य ठरणार नाही, याचा सरकारने विचार करावा, अशी भूमिका मांडत छात्र भारती कार्यकर्त्यांनी सभेतील अनेक ठिकाणी हे पोस्टर्स लावले आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शाळाएकनाथ शिंदे