Join us

विरोध झाला; तरीही नैतिक भूमिका मांडणारच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 6:47 AM

माझी नैतिक भूमिका मांडणारच, त्याची किंमत मोजायला लागली तरीही चालेल. मात्र विरोध झाला तरी विचारांवर ठाम आहे.

मुंबई : माझी नैतिक भूमिका मांडणारच, त्याची किंमत मोजायला लागली तरीही चालेल. मात्र विरोध झाला तरी विचारांवर ठाम आहे. बायबलने शत्रूंवर प्रेम करण्याची शिकवण दिली आहे, जे विरोध करतात ते माझे बंधूच आहेत. जेव्हा मूलभूत मानवी हक्कांवर गदा आली, तेव्हा तेव्हा मी त्याविरुद्ध आवाज उठवला. यापुढेही त्याविरोधात बोलणार, मी कुणाला भीत नाही. भारतीय राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यामुळे मला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याच्या निमित्ताने मुंबई पत्रकार संघाने सोमवारी फादर यांचा वार्तालाप आयोजित केला होता. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रबळ विरोधाशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही. धर्माचा वापर राजकारणासाठी करणे हे धर्माचे अवमूल्यन आहे. धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करणे हे समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. धर्माचा वापर करून राजकारण केल्यावर काय होते, याची प्रचिती युरोपमध्ये आली आहे. जनतेशी खोटे बोलू नका, असे ते म्हणाले.मानवाच्या जगण्याचे विषय धर्माशी जोडले पाहिजेत. धर्मग्रंथामध्ये शास्त्रीय चिकित्सा झाली पाहिजे. माझा ईश्वर शत्रूवरही प्रेम करायची शिकवण देतो. त्यामुळे जे मलाविरोध करीत आहेत त्यांच्यावरहीमी प्रेम करतोच, असे दिब्रिटो यांनी सांगितले.‘असत्याला भवितव्य नाही, हे लक्षात ठेवायला हवे’सहिष्णुतेची पुढची पायरी प्रेम भावना आहे. विरोधाचे स्वागत करतो. मला झालेल्या विरोधाचे मी आत्मचिंतन करतो. आपला देश एकच आहे. एकतेची भावना जोपासा. आपल्या संतांनी एकतेची शिकवण दिली. सत्याला मरण नाही आणि असत्याला भवितव्य नाही हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे, असेही फादर दिब्रिटो यांनी सांगितले.

टॅग्स :फादर फ्रान्सिस दिब्रिटो