कफ परेड-नरिमन पॉइंट सागरी पुलाला मच्छिमार संघटनांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:49 AM2021-02-01T02:49:49+5:302021-02-01T07:53:43+5:30
Cuff Parade-Nariman Point Sea Bridge : प्रस्तावित कफ परेड ते नरिमन पॉइंट सागरी उन्नत पुलाच्या बांधकामाला अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने विरोध दर्शविला आहे.
मुंबई : प्रस्तावित कफ परेड ते नरिमन पॉइंट सागरी उन्नत पुलाच्या बांधकामाला अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने विरोध दर्शविला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांचे निवारण जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत होणाऱ्या नियोजनाला आणि संभावित सागरी सर्व्हेला समितीचा विरोध राहणार आहे.
या पुलामुळे स्थानिक मच्छीमारांच्या होणाऱ्या नुकसानाचा विचार होणे अत्यावश्यक आहे. समुद्रातील जैविकतेचा अभ्यास करण्यात यावा. तसेच अहवाल येईपर्यंत प्रशासनाने बांधकाम करण्याची घाई टाळावी. एम.एम.आर.डी.ए प्रकल्पाची प्रस्तावना करताना कॉस्ट-टू-बेनिफिटचा अभ्यास करणार हे निश्चित आहे. परंतु त्यांनी या प्रकल्पामुळे बेनिफिट-टू-मच्छीमारांच्या नुकसानाचा अभ्यास करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी सांगितले.
प्रकल्पामुळे जर मच्छीमारांच्या मासेमारी प्रक्रियेवर बंधन येत असतील किंवा नुकसान होत असतील तर प्रकल्पाला विरोध करणार याची नोंद सरकारने घ्यावी, असे तांडेल यांनी म्हटले आहे. एम.एम.आर.डी.ए.ने समितीच्या मागणीचा विचार करून मच्छीमारांबरोबर संवाद साधावा, असेही समितीने म्हटले आहे. त्यामुळे सरकार आता या मागणीकडे व विराेधाकडे किती गांभीयाने बघते या बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.