Join us

बापाला दारू प्यायला विरोध केला, पोटच्या अल्पवयीन पोराला संपवलं

By गौरी टेंबकर | Published: March 26, 2024 7:39 PM

आलोकची आई आणि आलोक यांना स्वत:ला कुटुंब चालवण्यासाठी नोकरी करावी लागली. तर गुप्ता दारू पिऊन घरी येऊन बायकोला मारहाण करायचा.

मुंबई: सांताक्रूझ येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. दारू प्यायला विरोध केल्याने हा प्रकार रविवारी रात्री घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार वाकोला पोलीस अधिक तपास करत आहे.

सांताक्रूझ (पूर्व) येथील वाघरीपाडा येथे राहणाऱ्या दिनेश गुप्ता या मजुराचा रविवारी सकाळी मुलगा आलोकसोबत जोरदार वाद झाला. भांडणाच्या वेळी गुप्ताने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि थेट आलोकला भोसकले. आलोकच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने व्हीएन देसाई रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. आलोकची १९ वर्षांची बहीण प्रिती हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सोमवारी गुप्ताला अटक केली.

तपासादरम्यान असे समोर आले की, आलोकची आई आणि आलोक यांना स्वत:ला कुटुंब चालवण्यासाठी नोकरी करावी लागली. तर गुप्ता दारू पिऊन घरी येऊन बायकोला मारहाण करायचा. वडिलांच्या दारू पिण्याच्या या सवयीमुळे वैतागलेल्या आलोकला त्याचा राग यायचा. रविवारी गुप्ता दारूच्या नशेत घरी आला आणि आलोकला शिवीगाळ करू लागला. आलोकने वडिलांचा निषेध करत त्यांना तोंड बंद करण्यास सांगितले. यावरून पिता-पुत्र यांच्यात जोरदार वादावादी झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. या वादाला हिंसक वळण लागले आणि गुप्ताने आलोकच्या पोटात चाकूने वार करून त्याची हत्या केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. गुप्तावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि ५०४ (शाब्दिक शिवीगाळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई