दुबार नोकऱ्यांसाठीच रात्रशाळा निर्णयाला विरोध!
By admin | Published: June 13, 2017 02:46 AM2017-06-13T02:46:20+5:302017-06-13T02:46:20+5:30
रात्रशाळांबाबत राज्य शासनाने २१ मे २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. शासन निर्णयाविरोधात शिक्षक भारतीने मंत्रालयासमोरच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रात्रशाळांबाबत राज्य शासनाने २१ मे २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. शासन निर्णयाविरोधात शिक्षक भारतीने मंत्रालयासमोरच १५ जून रोजी रात्रशाळा भरवण्याचा इशारा
दिला आहे. याविरोधात दुबार नोकऱ्या करणाऱ्या शिक्षकांच्या मतांसाठी निर्णयाला विरोध होत असल्याचे सांगत शिक्षक परिषदेच्या रात्रशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शासनाच्या २१ मे २०१७ रोजीच्या रात्रशाळा संदर्भातील निर्णयामुळे रात्रशाळांना खऱ्या अर्थाने स्थैर्य
प्राप्त होईल, असे मत संघटनेचे
अध्यक्ष सुनील सुसरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त
केले आहे. सुसरे म्हणाले की, या निर्णयामुळे रात्र शाळांना पूर्णवेळ शिक्षक मिळणार असून, दुबार उत्पन्नाचे साधन बंद झाले
आहे. मुळात राज्यात शिक्षक भरती
बंद असून, अनेक पात्र शिक्षक नोकरीच्या शोधात आहेत. अशा स्थितीत एकच व्यक्ती हितसंबंधांच्या आधारे दीड नोकरी मिळवून दीड पगार घेत आहे. ते आता बंद होऊन अतिरिक्त ठरलेले पूर्णवेळ शिक्षक रात्रशाळांना मिळणार आहेत. तर याउलट रात्रशाळेतील १ हजार १० अनुभवी शिक्षकांना काढून टाकणाऱ्या निर्णयामुळे शाळा बंद पडण्याची भीती शिक्षक भारतीने व्यक्त केली आहे. शिवाय शासनाविरोधात मंत्रालयासमोर १५ जूनला रात्रशाळा भरवण्याचा इशाराही दिला आहे.
...हातचे तूप गेल्याने आक्रोश!
शासन निर्णयामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना रात्रशाळांवर पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाचणार असून, दुबार उत्पन्न घेणाऱ्या शिक्षकांच्या हातचे तूप जाणार असल्याने संबंधित संघटनांच्या पोटात गोळा येत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.