Join us  

सेल्फी काढून पाठवण्यास शिक्षकांचा विरोध

By admin | Published: January 05, 2017 6:33 AM

शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी आणि अनियमित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून सरल प्रणालीवर टाकण्याची शक्कल

मुंबई : शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी आणि अनियमित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून सरल प्रणालीवर टाकण्याची शक्कल शिक्षण विभागाने लढवली आहे. हायटेक होताना सेल्फीचा उपाय शिक्षण विभागाला सुचला असला, तरीही शिक्षक, मुख्याध्यापकांचा या निर्णयाला विरोध आहे. कारण सेल्फी काढण्यासाठी सरकारतर्फे त्यांना कोणतीही मदत मिळणार नसून, तांत्रिक बिघाड असल्यास जबाबदारी कोण घेणार असा शिक्षकांचा प्रश्न आहे. जानेवारी २०१७ च्या पहिल्या सोमवारपासून शिक्षकांनी सेल्फी काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. ख्रिसमसच्या सुट्टीनंतर सोमवारी मुंबईतील शाळा सुरू झाल्या, पण सोमवारी शाळेतील शिक्षकांनी सेल्फी काढलेच नाहीत. सेल्फी काढण्यासाठी शिक्षकांना स्वत:च्या मोबाइलचा वापर करावा लागणार आहे. त्याचबरोबर, इंटरनेटची सुविधाही शिक्षकांना पुरवण्यात येणार नाही. शिक्षकांनी मुलांबरोबर सेल्फी काढून टाकण्यात बराच वेळ जाणार. त्यासाठी वेगळ््या वेळाची कोणताही उपाय सुचवलेला नाही. काही शिक्षकांना सेल्फी काढणे, ते अपलोड करणे हे माहीत नाही. अशा शिक्षकांनी काय करायचे? त्याचबरोबर, काही तांत्रिक बिघाड झाल्यास, त्यासाठी कोण जबाबदार राहाणार हेदेखील निश्चित करण्यात आले नसल्याचे, शिक्षण लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले. जानेवारीच्या पहिल्या सोमवारपासून सुरू करण्यात येणारा सेल्फीचा उपक्रम पहिल्याच सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे सपशेल फसला, पण पुढच्या सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. मुंबईसह राज्यातील शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबरचा सेल्फी सरल प्रणालीवर अपलोड करायचा असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाले असून, चाचणी पूर्ण झाली आहे. शिक्षण विभागावर झालेल्या टीकेमुळे सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. पुढच्या सोमवारी कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आता पुन्हा सर्व शाळांना शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात येणार आहेत. तंत्रस्नेही शाळा व शिक्षक त्यासाठी मदत घेतली आहे. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु आहे. (प्रतिनिधी)