........................................
आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात, इन्स्टंट फूडच्या जमान्यात आपण कुठेही, काहीही खात असतो. खाण्याबाबतच्या सर्व नियमांचे उल्लंघन करीत असतो. कोणत्या पदार्थाबरोबर कोणता पदार्थ खावा? कोणत्या पदार्थाबरोबर कोणता पदार्थ केव्हा खाऊ नये? याबाबत आयुर्वेद शास्त्राने काही नियम सांगितले आहेत. त्यापैकी एक नियम आहे, विरुद्धाशन अर्थात विरुद्ध आहार. चुकीच्या खाण्यामुळे विविध रोग निर्माण होतात. आज कशाबरोबरही काहीही खाल्ले जाते परिणामी अनेक रोग होतात. हे आपण थोड्याशा नियमांचे पालन केले तर टाळू शकतो.
परस्परविरोधी गुणांची व शरीरातील धातूंच्या विरुद्ध स्वभावाची द्रव्ये सेवन केली असता ती शरीरातील धातूंना विरोध करतात. यापैकी काही द्रव्ये संस्काराने तर काही संयोगाने, काही देश, काल, प्रमाण या कारणांनी तर काही स्वभावतःच विरुद्ध असतात.
- काही उदाहरणे
१) मासे व दूध एकत्र खाऊ नयेत. कारण मासे उष्ण तर दूध शीत आहे. शीत व उष्ण विरोधामुळे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने रक्तदूषित होते, शरीरातील स्रोतसे(मार्ग)बंद होतात.
२)कोंबडी, बोकड, ससा, डुक्कर, घोरपड इ. प्राण्यांचे मांस व विविध प्रकारचे मासे, खेकडे हे दूध, गूळ, उडीद, मुळा इ. पदार्थांबरोबर खाऊ नये.
३)दुधाबरोबर मीठ.
४)दूध व केळी यांचे ‘शिकरण’ करून खाण्याची पद्धत आहे. ५)मांस शिजवताना त्यात तुपाचा वापर करणे.
६) मांसाहार करताना त्याबरोबर दही खाणे वा कोशिंबीर खाणे.
७)कच्चे अंडे दुधात घालून सकाळी अनुशापोटी पिणे.
८) साबुदाणा व दही एकत्र खाणे.
९) विविध प्रकारचे इन्स्टंट पदार्थ.
१०)जेवणानंतर त्वरित पोहे खाणे.
११)कॉकटेल पिणे.
१२)आंबा सोडून कोणतेही फळ दुधाबरोबर खाणे, मिल्क शेक पिणे.
१३)दही गरम करून वा गरम पदार्थाबरोबर खाणे.
१४) मध गरम करून वा गरम पदार्थात मिसळून खाणे.
१५) मांसाहार केल्यानंतर त्वरित लस्सी, ताक पिणे.
१६)विविध प्रकारचे चायनीज पदार्थ
१७)नाश्ता वा जेवणानंतर आईस्क्रिम खाणे वा थंड पेये पिणे इत्यादी
अशी अनेक उदाहरणे विरुद्ध आहाराची व्यवहारात दिसून येतात. विरुद्ध आहार सेवनाने सामान्यतः पुढील रोग होतात.
विविध प्रकारचे त्वचारोग, सर्वांगाला सूज येणे, मुतखडा, ताप, पोटात पाणी होणे, रक्तपित्त, जुलाब होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूळव्याध, भगंदर, अर्धांगवायू, बुद्धी जड होणे, बोलता न येणे, पोटातील व्रण, आम्लपित्त, अजीर्ण, कर्करोग इ.
विरुद्ध आहाराची वा अहितकर आहाराची कल्पना आज आधुनिक वैद्यक, आहार शास्त्राला ही मान्य होऊ लागली असून यावर संशोधन सुरू आहे. पोषक घटक असूनही काही पदार्थ अपायकारक असू शकतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. काही प्रकारचे चीज खाल्ल्यानंतर रक्तदाब वाढतो, यकृताला सूज येते वा कर्करोग ही होऊ शकतो.
येथे एक गोष्ट लक्षात घ्या की, अशा प्रकारचे पदार्थ एकदा, दोनदा खाल्ले की काही होते असे नाही तर या प्रकारचे पदार्थ सातत्याने खाल्ले की ते अपायकारक होतात व परिणामी रोग होतात. यामुळे होणाऱ्या रोगात बरेच वेळा तपासण्यात काही कारण आढळून येत नाही परंतु केल्या जाणाऱ्या आहाराचा बारकाईने विचार केल्यास रोगाचे कारण सापडू शकते.
भविष्यात विरुद्ध, अयोग्य आहार विचारांना फार महत्त्व येणार आहे, यात शंकाच नाही.
- डॉ. अंकुश जाधव