Join us

सोशल मीडियावर सहा कोटी उडविण्यास विरोधकांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 1:08 AM

स्वत:चा माहिती तंत्रज्ञान विभाग असताना, अन्य संस्थेला सहा कोटी रुपये देण्यास विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला.

मुंबई : नागरिकांच्या तक्रारी तत्काळ पोहोचून त्या सोडवता याव्यात, यासाठी महापालिका प्रशासन केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. मात्र, यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. स्वत:चा माहिती तंत्रज्ञान विभाग असताना, अन्य संस्थेला सहा कोटी रुपये देण्यास विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. मात्र, सत्ताधापी शिवसेनेने हा प्रस्ताव विरोधकांना न जुमानता स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी बहुमताने मंजूर केला.

महापालिकेच्या विभाग कार्यालयांची माहिती, अपडेट आणि कार्यक्रम या व्यासपीठावर मुंबईकरांना समजू शकणार आहेत. विविध प्रकारच्या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या असल्याने, या कामात आणखी सुसूत्रता आणून गतिमान सेवा देण्यासाठी केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफार्म विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये पालिकेच्या सोशल मीडिया उपक्रमांचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी)कडून मनुष्यबळ सेवा घेण्यात येणार आहे.

मात्र, या प्रकल्पावर पालिका कोट्यवधी रुपये उधळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख यांनीही विरोध केला, परंतु हा प्रस्ताव शिवसेना-भाजपने बहुमताने मंजूर केला. त्याचबरोबर, महापालिकेने आपला जनसंपर्क विभागही सक्षम आणि अद्ययावत करावा, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिल्या.असे चालणार काम; फेसबुक, ट्विटरचा वापर- फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून विविध विभाग कार्यालयांची माहिती.- माहिती-तंत्रज्ञान सल्लागार मेसर्स केपीएमजी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार व महाआयटी यांच्यामार्फत ३५ आयटी आॅफिस सहायक व सोशल मीडिया तज्ज्ञ आदी मनुष्यबळसेवा घेण्यासाठी २७ जून, २०१९मध्ये करार करण्यात आला आहे.- १६ जुलै, २०१९ ते १५ जुलै, २०२२ पर्यंत ही मनुष्यबळाची सेवा घेऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची देखभाल केली जाणार आहे. यासाठी पाच कोटी ७९ लाख ९४ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.- फेसबुक आणि ट्विटरवर पालिकेच्या वतीने जनजागृती, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्या तक्रारी जाणून घेणे, विश्लेषण करणे, तक्रारी-समस्यांना उत्तरे देणे आदी कामे केली जातील.- ही टीम आपत्कालीन व्यवस्थापनाच्या टीमसोबत समन्वय साधून आणि नियंत्रणाखाली काम करणार आहे.असे आहे पालिकेचे सोशल व्यासपीठपालिकेने MCGM24X7 मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. या माध्यमातून नागरिकांना पाणीपट्टी, मालमत्ता कर, तक्रारी, शौचालय शोधक आणि आपत्ती, इव्हेंट हायलाइट्स आणि संदेश देण्याची सुविधा उपलब्ध आहे. www.portal.mcgm.gov.in या वेबपोर्टलवरून नागरिकांना विभाग कार्यालयांचा तपशील, दिल्या जाणाऱ्या नागरी सेवा-सुविधाही पुरविल्या जातात.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका