दीपक मोहिते, वसईमहानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपामधील एका गटाने आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी समझोता करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. पालघर जिल्हापरिषद निवडणुकीत भाजप, बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची मोट बांधली गेल्याने सेनेमध्ये नाराजी आहे. यंदा वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा तशी आघाडी होता कामा नये म्हणून भाजपामधील एक गट सक्रीय झाला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काहीजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत पण त्यांची भेट कशासाठी आहे याबाबत मला काही माहिती नाही. मी मात्र गेलो नाही. दुसरीकडे शिरीष चव्हाण यांनीही आघाडी व भाजपा यांच्यात युती होईल ही शक्यता फेटाळुन लावली. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भाजपाने आमच्या समवेत युती करण्याची बोलणी सुरू केली आहेत. मात्र, बहुजन विकास आघाडी व भाजपा एकत्रितपणे निवडणूक लढवतील असे मला वाटत नाही. बहुजन विकास आघाडीचे नेते मात्र यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत. याबाबतीत केवळ आ. हितेंद्र ठाकूरच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आताच काही सांगणे शक्य होणार नसल्याचे अनेकांनी सांगितले.बहुजन विकास आघाडीतर्फे यंदा युवा विकास मंडळाच्या तरूणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार आहे. आ. क्षितीज ठाकूर यांनी तरूणांना ३० टक्के जागा देऊ असे जाहीर केल्यामुळे तरूण वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
बविआ सोबतच्या आघाडीला भाजपातूनच विरोध
By admin | Published: April 02, 2015 11:04 PM